रेल्वे तिकीटांचा काळाबाजार, खामगातील दोघांना घेतले ताब्यात
By अनिल गवई | Published: March 8, 2024 12:08 AM2024-03-08T00:08:21+5:302024-03-08T00:08:29+5:30
खामगावात खळबळ: शेगाव रेल्वे पोलिसांची कारवाई
खामगाव: रेल्वे तिकीटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी शेगाव येथील रेल्वे पोलीसांनी खामगावातील दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. या कारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, खामगाव येथील काही जण रेल्वेच्या तिकीटांचा काळाबाजार करीत असल्याची गुप्त माहिती शेगाव रेल्वे पोलीसांना मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर शेगाव रेल्वे पोलीस खामगावात धडकले. खामगाव पोलीसांच्या मदतीने रेल्वे पोलीसांच्या पथकाने खामगावातील संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली. दरम्यान, शैलेश मोहता (रा. शिवाजी वेस) आणि जयेश शर्मा (रा. नटराज गार्डन) या दोघांना ताब्यात घेतले. दोघांनाही शेगाव येथे नेण्यात आले. दोघांचेही मोबाईल आणि काही दस्तवेज जप्त करण्यात आले.
रेल्वेचा फेक आयडी तयार करून आरोपींनी अनेकांची फसवणूक केल्याचीही जोरदार चर्चा आहे. यामध्ये आणखी आरोपींची संख्या वाढणार असल्याचा दावा पोलीस सुत्रांनी केला असून, रेल्वे प्रशासनातील निगडीत काहींशी आरोपींचे संगनमत असल्याचीही जोरदार चर्चा खामगावात होती. खामगाव येथे या दोघांना सहज आरक्षण मिळत असल्याचेही तपासात समोर आले. याप्रकरणी पुढील तपास शेगाव रेल्वे पोलीस करीत आहेत.