माजलगावात शासकीय कामासाठीच्या वाळूघाटावरील काळा बाजार उजेडात; महसूल व पोलीस पथकांने केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 06:15 PM2018-09-07T18:15:24+5:302018-09-07T18:17:07+5:30
तालुक्यातील डूब्बाथडी येथे शासनाच्या विशेषत्वाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कामासाठी वाळूघाट आहे.
माजलगाव (बीड ) : तालुक्यातील डूब्बाथडी येथे शासनाच्या विशेषत्वाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कामासाठी वाळूघाट आहे. मात्र, येथे काही खाजगी वाहने वाळूची तस्करी करत असल्याचे महसूल व पोलीस पथकाने आज पहाटे टाकलेल्या छाप्यात उघड झाले. या कारवाईत पथकाने ४१ गाड्या जप्त केल्या असून पुढील कारवाई सुरु आहे.
डूब्बाथडी ग्रामस्थांनी महसूल विभागाकडे येथील वाळू घाटावर वाळूची मोठ्याप्रमाणात तस्करी होत असल्याची तक्रार दाखल केली होती. यावरून महसूल व पोलिसाच्या संयुक्त पथकाने आज पहाटे येथील वाळूघाटावर छापा मारला. यावेळी येथे वाळू घेऊन जाणाऱ्या ११ व भरण्यासाठी आलेल्या ३० गाड्या आढळून आल्या. या गाड्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे कसलीही अधिकृत कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे सदर गाड्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या संयुक्त पथकाने केली.
दंडात्मक कारवाई करण्यात येईल
ताब्यात घेण्यात आलेली वाहने प्रथम दर्शनी खाजगी असल्याचे निदर्शनास आले आहे. कंपनीने त्यांची वाहने असल्याबाबत दुजोरा न दिल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- प्रियांका पवार, उपविभागीय अधिकारी माजलगाव
गुन्हा दाखल करण्यात येईल
वाहन धारकांकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्रे आढळून आली नाहीत. यामुळे महसूल विभागाच्या निर्देशानुसार दंडात्मक कारवाई करून चालक मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.
- भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी