सीसीटीव्ही कॅमेरावर काळा स्प्रे मारला अन् अवघ्या दहा मिनिटांत एटीएम फोडले!
By काशिनाथ वाघमारे | Published: January 9, 2024 07:38 PM2024-01-09T19:38:25+5:302024-01-09T19:39:00+5:30
पोलिस सूत्राकडील माहितीनुसार मोडनिंब शहरात स्टेशन रोड लागत एका बँकेचे एटीएम आहे.
सोलापूर : येथील स्टेशन रोड लगत एका बँकेचे एटीएम फोडून १२ लाख ८० हजार ८०० रुपये चोरट्यांनी लंपास केले. मंगळवारी पहाटे घडलेल्या या घटनेने मोडनिंब शहरात एकच खळबळ उडाली.
पोलिस सूत्राकडील माहितीनुसार मोडनिंब शहरात स्टेशन रोड लागत एका बँकेचे एटीएम आहे. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमाराला चार चाेरटे पांढऱ्या कारमधून आले आणि त्यापैकी एकाने सीसीटीव्ही कॅमेरा वर काळा स्प्रे फवारून कॅमेरे बंद करण्याचा प्रयत्न केला. अन्य साथीदारांनी कारमधून गॅसकटर बाहेर काढून त्याच्या साह्याने एटीएममधील १२ लाख ८० हजार ८०० रुपयांची रोकड काढून घेतली. त्यानंतर त्याच कारमधून पसार झाले.
या घटनेनंतर सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळ्याचे अजित पाटील, शुभम कुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश निंबाळकर, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सोलापूर येथील श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर संबंधीत बँकेचे शाखाधिकारी सनत दानोळे यांच्याशी संवाद साधला असता चोरट्यांनी फोडलेले एटीएम आपल्याच बँकेचे असून याचे टेंडर एका कंपनीला देण्यात आल्याचे ते म्हणाले.याचा तपास टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के करीत आहेत.
आरोपी ३५ वयोगटातील ..
सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारण्यापूर्वी चोरटे फुटेज मध्ये कैद झाले आहेत. हे आरोपी ३० ते ३५ वयोगटातील असून अवघ्या दहा मिनिटांमध्ये हे एटीएम फोडून त्यातील रोकड लंपास केली. स्टेशन रोडवर पहाटे चार नंतर अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. एटीएम फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.