चक्क अंध व्यक्तीनेच चोरल्या मोटारसायकली!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 04:29 AM2020-03-17T04:29:06+5:302020-03-17T04:29:25+5:30
नुकत्याच येऊन गेलेल्या अंधाधुन चित्रपटासारखीच ही घटना आहे. चित्रपटात सहानुभूती मिळवण्यासाठी नायक अंध असल्याचे दाखवतो. येथे खटले रद्द करण्यासाठी अंध असल्याचे प्रमाणपत्र दाखवीत आहे.
- खुशालचंद बाहेती
नवी दिल्ली : गुजरात पोलिसांनी अहमद शेख नावाच्या व्यक्तीला ५ मोटारसायकली चोरल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. आश्चर्य म्हणजे अहमद शेख हा शंभर टक्के अंध असल्याचे प्रमाणपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या अंधाधुन चित्रपटासारखीच ही घटना आहे. चित्रपटात सहानुभूती मिळवण्यासाठी नायक अंध असल्याचे दाखवतो. येथे खटले रद्द करण्यासाठी अंध असल्याचे प्रमाणपत्र दाखवीत आहे.
डिसेंबर २०१९ मध्ये रानोल, इसानपूर व नरोडा पोलीस ठाणे हद्दीतून मोटारसायकली चोरल्याबद्दल रखियाल (गुजरात) येथील अहेमद शेख याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरुद्ध या पोलीस ठाण्यात प्रत्येकी १ आणि वाटवा पोलीस ठाण्यात २, असे एकूण ५ गुन्हे नोंदवण्यात आले.
या सर्व गुन्ह्यातील सहआरोपींनी दिलेल्या माहितीवरून अहेमद शेख याला आरोपी करून एकापाठोपाठ एक गुन्ह्यात अटक करण्यात आली. एका गुन्ह्यात त्याला न्यायालयात कोठडीसाठी पोलिसांनी हजर केल्यानंतर त्याच्या वकिलांनी तो पूर्णपणे अंध असल्याचा दावा केला. २००९ मध्ये अंध व्यक्ती संघटनेने आणि २०१७ मध्ये सरकारी दवाखान्याने दिलेलेअहेमद शेख १०० टक्के अंध असल्याचे प्रमाणपत्र सादर केले.
पूर्णपणे अंध असणारी व्यक्ती मोटारसायकल चोरी करू शकत नाही, असे न्यायालयाला सांगितले. पोलिसांनी मात्र या बचावाचा जोरदार विरोध केला. बापूनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अहेमद शेख मोटारसायकल चालवताना एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने अहेमद शेख याला जामीन नाकारला व न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
१00 टक्के अंध असल्याचा दावा
जिल्हा न्यायालयात जामीन न मिळाल्याने शेख याने गुजरात उच्च न्यायालयात त्याच्या विरुद्धचे सर्व एफआयआर रद्द व्हावेत म्हणून याचिका दाखल केली आहे.
याचिकेत तो १०० टक्के अंध असून, त्याला दैनंदिन कामे करण्यासही मदत घ्यावी लागते, असा दावा केला आहे.
उच्च न्यायालयाचे न्या. एस.एच. व्होरा यांनी या याचिकेवर पोलिसांचे म्हणणे मागविले आहे.
यापूर्वी २०१७ मध्येही २ मोटारसायकली चोरीच्या गुन्ह्यात शेख याला अटक करण्यात आली होती. यापैकी एका गुन्ह्यात तो अंध असल्याच्या मुद्यावर त्याची सुटका झाली.
या गुन्ह्यात फिर्यादीची मोटारसायकल मिळाल्याने त्यानेही अंग काढून घेतले. दुसरा गुन्हा न्यायालयात प्रलंबित आहे.