पतीला जीवे मारण्याची धमकी देत, अंध महिलेवर अत्याचार

By नितिन गव्हाळे | Published: April 6, 2023 05:58 PM2023-04-06T17:58:44+5:302023-04-06T17:59:01+5:30

दोन तासांत आरोपी गजाआड: आरोपीस पाच दिवसांची पोलिस कोठडी

Blind woman assaulted, threatening to kill husband crime news in Akola | पतीला जीवे मारण्याची धमकी देत, अंध महिलेवर अत्याचार

पतीला जीवे मारण्याची धमकी देत, अंध महिलेवर अत्याचार

googlenewsNext

अकोला: पतीला जीवे मारण्याची धमकी देत, आरोपीने अंध महिलेवर सतत तीनवेळा अत्याचार केला. याप्रकरणात एलसीबी पोलिसांनी दोन तासांमध्ये आरोपीला गजाआड केले. पोलिसांनी आरोपी गुलाम रसूल शेख मतीन(२६) रा. भगतवाडी मरगट याला गुरूवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

महिलेच्या तक्रारीनुसार दोघेही अंध पती-पत्नी ३१ मार्च रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास सासरी लहान मुलीला भेटण्यासाठी बसगाडीने अचलपूर बसगाडीने नविन बसस्थानकावर आले होते. त्यांना जुने बसस्थानकावर जायचे असल्याने, त्यांनी एका व्यक्तीस जुने बसस्थानक कुठे आहे. असे विचारले असता, त्या व्यक्तीने दोघांना जुने बसस्थानकावर सोडून दिले. परंतु बसगाडी न मिळाल्याने, त्या व्यक्तीने रेल्वे स्टेशनवर सोडून देण्याचा बहाणा करीत, रेल्वे मार्गाकडील अज्ञात स्थळी नेले आणि याठिकाणी पतीला जीवे मारण्याची धमकी देत, त्याने सतत तीन वेळा अंध विवाहित महिलेवर अत्याचार केला आणि याची कुठे वाच्यता केल्यास, जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे दोघाही पती-पत्नीने याची कुठेही वाच्यता केली.

अखेर महिलेने ५ एप्रिल रोजी सिव्हील लाइन पोलिस ठाण्यात धाव घेत, तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने आरोपीस अटक करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष महल्ले, एपीआय महेश गावंडे यांच्या पथकाने नविन व जुने बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. त्याआधारे त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि अवघ्या दोन तासांमध्ये त्यांनी गुलाम रसूल शेख मतीन(२६) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सिव्हील लाइन पोलिसांनी आरोपीला अटक करून गुरूवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपी गुलाम रसूल याला १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पुढील तपास सिव्हील लाइनचे ठाणेदार भाऊराव घुगे, एपीआय पंकज कांबळे करीत आहेत.

रेल्वे स्टेशन सोडून देण्याचा बहाणा अन् अत्याचार
आरोपी गुलाम रसुल याने दोघाही पती-पत्नीच्या अंध आणि असहायतेचा फायदा घेऊन त्यांना इलेक्ट्रिक ऑटोरिक्षाने रेल्वे स्टेशनवर सोडून देण्याची बतावणी केली आणि ऑटोने रेल्वे मार्गाजवळ नेऊन अंध विवाहित महिलेवर अत्याचार केला.

नाव, ओळख नसल्यावरही आरोपी जेरबंद

एलसीबीने पथके तयार केले. परंतु लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचे नाव, ओळख नसल्याने व कोणत्याही प्रकारचा सुगावा नसताना अडचणी निर्माण झाल्या होता. परंतु त्या दूर सारत, एसीबी पथकाने कसोशीने प्रयत्न करून आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्याला अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीने गुन्हा कबुल केला.

Web Title: Blind woman assaulted, threatening to kill husband crime news in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.