जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच केली भावाची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 09:09 PM2021-12-27T21:09:52+5:302021-12-27T21:10:13+5:30

Crime News : पेण तालुक्यातील हनुमानपाडा येथील घटना

Blood related brother shot and killed his brother in a land dispute | जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच केली भावाची गोळ्या झाडून हत्या

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच केली भावाची गोळ्या झाडून हत्या

googlenewsNext

वडखळ - पेण तालुक्यातील हनुमानपाडा येथील सख्या भावानेच आपल्या सख्या भावाची जमिनीच्या वादातून घराच्या अंगणात हत्या केल्याची घटना घडली आहे. फरार खुनी भावाला दादर सागरी पोलिसांनी काही तासातच पनवेल येथून अटक केली आहे. 
     

सविस्तर घटना अशी की, फिर्यादी संतोष राम पाटील ( वय 40) रा.हनुमानपाडा यांचे वडील राम हरिभाऊ पाटील व काका पांडुरंग हरिभाऊ पाटील रा.हनुमानपाडा यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वडिलोपार्जित जमिनीच्या गुरांच्या वाड्याच्या वाटपावरून वाद चालू होता. रविवार दिनांक 26 डिसेंबर रोजी परेश पांडुरंग पाटील व राम हरिभाऊ पाटील यांची पत्नी प्रभावती व मुलगा संतोष यांच्यामध्ये घरासमोर वाद झाला. सदर वाद मिटल्यानंतर संतोष पाटील व त्याची आई प्रभावती पाटील हे दोघे त्याबाबत तक्रार देण्यास दादर सागरी पोलीस ठाण्यात आले असल्याचे पाहून पांडुरंग हरीभाऊ पाटील, परेश पांडुरंग पाटील व शैला पांडुरंग पाटील ( सर्व राहणार हनुमानपाडा) हे फिर्यादी संतोष राम पाटील यांच्या घराच्या अंगणात जाऊन त्यांनी राम पाटील यांना शिवीगाळ करून पांडुरंग हरीभाऊ पाटील याने त्याच्याजवळ असणारी बारा बोर बंदुकीतून राम पाटील यांच्या छाती व पोटाच्या खाली गोळ्या झाडल्या. त्यात राम हरिभाऊ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
    

सदर घटनेची माहिती मिळताच रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी विभा चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि या घटनेच्या तापसाबाबत सूचना दिल्या. त्यानुसार दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक के.आर . भौड, भुसाने, पोलीस हवालदार मुंडे, कोकरे, जाधव, पाटील यांनी सदर गुन्ह्यातील फरार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी पथक तयार करून यातील महिला आरोपी शैला पांडुरंग पाटील हिला ताब्यात घेऊन तिची सखोल चौकशी केली असता तिने फरार आरोपी पती व मुलगा हे पनवेल येथे गेले असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे तिच्या माहितीवरून सदर पथक पनवेल येथे जाऊन शिताफीने पांडुरंग पाटील व परेश पाटील यांना काही तासातच ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे. दादर सागरी पोलीस ठाण्यात भा. दं.वि. कलम 302/34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3 /25/27 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Blood related brother shot and killed his brother in a land dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.