बटाट्याच्या ढिगाऱ्याखाली सापडले ४ कोटींचे रक्तचंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 12:53 PM2022-06-05T12:53:55+5:302022-06-05T12:54:46+5:30
Blood sandalwood : सदाशिव सीताराम झावरे (एमआयडीसी, नगर) असे अटक केलेल्या पुष्पाचे नाव आहे.
अहमदनगर : नागापूर एमआयडीसीतील एका गोदामावर छापा टाकून बटाट्याच्या ढिगाऱ्याखाली लपविलेले तब्बल साडेसात टन रक्तचंदन पोलिसांनी जप्त केले. या रक्तचंदनाची किंमत अंदाजे ३ कोटी ८३ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. चंदनतस्करीचे मोठे रॅकेट नगर शहरात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सदाशिव सीताराम झावरे (एमआयडीसी, नगर) असे अटक केलेल्या पुष्पाचे नाव आहे. नागापूर एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्याशेजारी असलेल्या गोदामात रक्तचंदन साठविल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. या माहितीआधारे शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे यांनी शुक्रवारी रात्री उशिराने गोदामावर छापा टाकला असता, त्यांना बटाट्याच्या गोण्यांचा ढीग असल्याचे आढळून आले.
मात्र पोलिसांनी बटाट्याच्या गोण्या बाजूला केल्या. त्याखाली रक्तचंदनाच्या लाकडांचा मोठा ढीग दिसला. पोलिसांनी तात्काळ वन खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले व चंदनाची मोजदाद सुरू केली. हे चंदन एकूण ७ टन ६६० किलो इतके भरले. दरम्यान, गोदामाचा मालक झावरे हाही याच परिसरात आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.