WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 02:56 PM2024-09-25T14:56:42+5:302024-09-25T15:04:54+5:30
मुलीला काहीतरी संशय आल्याने तिने पोलिसांना माहिती दिली.
दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलगी जेव्हा तिच्या घरी जायची तेव्हा ती घरमालकाच्या मुलाला फ्लॅटच्या चाव्या देत असे. हे तिने अनेकदा केलं होतं. मात्र तीन महिन्यांपूर्वी घरमालकाच्या मुलाने याच गोष्टीचा फायदा घेत मुलीची खोली आणि बाथरूमच्या बल्ब होल्डरमध्ये दोन स्पाय कॅमेरे बसवले होते. मुलीला संशय आल्याने तिने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी आरोपी घरमालकाच्या मुलाला अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी जेव्हा तिचे WhatsApp चेक करत होती तेव्हा तिला सर्वात आधी संशय आला. तिच्या WhatsApp वर अशी काही ॲक्टिव्हिटी होत होती. ज्यामुळे तिला संशय आला. असे अनेक मेसेज होते जे तिने वाचले नव्हते, पण जेव्हा तिने तिचं WhatsApp चेक केलं तेव्हा मेसेजवर ब्लू टिक्स दिसत होत्या.
डीसीपी अपूर्वा यांनी सांगितलं की, विद्यार्थिनीला WhatsApp वर काही संशयास्पद हालचालीही दिसल्या. त्यानंतर तिने तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीशी याबाबत चर्चा केली. तेव्हा WhatsApp अकाऊंट हे दुसऱ्या लॅपटॉपवरही लॉग इन केल्याचं उघड झालं. पोलीस तपासात असं समोर आलं की, मुलीचा करणवर पूर्ण विश्वास होता आणि तो तिच्या फ्लॅटवर जायचा. त्यामुळे त्याने हे केल्याचा संशय होता.
दिल्ली पोलिसांनी करणची चौकशी केली आणि तपास केला तेव्हा त्यांना करणकडे एक स्पाय कॅमेरा तसेच दोन लॅपटॉप सापडले ज्यामध्ये तो रेकॉर्ड केलेले व्हिडीओ साठवत असे. करणने मुलीच्या घरात जो स्पाय कॅमेरा लावला होता तो रिमोटला किंवा ऑनलाइन कनेक्ट केलेला नव्हता, त्यामुळे करण कोणत्या ना कोणत्या बहाण्याने मुलीकडून फ्लॅटची चावी घेण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून तो चिपमधील डेटा ट्रान्सफर करू शकेल.
दिल्ली पोलिसांना करणविरुद्ध ठोस पुरावे सापडले, त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटकही करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करण हा दिव्यांग आहे. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थिनी आणि दिल्लीत भाड्याने फ्लॅटमध्ये एकट्या राहणाऱ्या महिलांना सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे आणि अनोळखी व्यक्तींवर किंवा कोणावरही जास्त विश्वास ठेवू नये असंही सांगितलं.