पुरात वाहून गेलेल्याचा मृतदेह आढळला, दोन बेपत्ता
By विलास गावंडे | Published: August 9, 2022 03:21 PM2022-08-09T15:21:53+5:302022-08-09T15:22:21+5:30
बाभूळगाव तालुक्यातील सावर येथील संतोष मेंढे हे सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मित्रासह दुचाकीने भिलुक्षा बोरगाव मार्गे राणीअमरावतीला जात होते. बोरगाव येथील नाल्याच्या पुरात दुचाकी कोसळली.
यवतमाळ : जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तीन जणांपैकी एकाचा मृतदेह आढळून आला, तर दोन जणांचा शोध घेतला जात आहे. यवतमाळ तालुक्यातील रोहटेक येथील भानुदास श्यामराव चौधरी (५५) यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कोनझरी (ता.घाटंजी) शिवारात नदीच्या काठावर आढळला. ते रविवारी शेतातून घरी परतत असताना वाघाडी नदीच्या पुरात वाहून गेले होते.
बाभूळगाव तालुक्यातील सावर येथील संतोष मेंढे हे सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मित्रासह दुचाकीने भिलुक्षा बोरगाव मार्गे राणीअमरावतीला जात होते. बोरगाव येथील नाल्याच्या पुरात दुचाकी कोसळली. यात संतोष मेंढे वाहून गेले. त्यांचा मित्र पुरातून बाहेर येण्यात यशस्वी झाला. मेंढे यांचा शोध घेतला जात आहे. या तालुक्यातील दुसरी घटना टाकळगाव येथे मंगळवारी सकाळी घडली. या गावातील डोमाजी उकंडा टेकाम (६५) हे टाकळगाववरून मांगुळ येथे जात होते. गावाजवळ असलेल्या एवडी नदीला आलेल्या पुरात ते वाहून गेले. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.