कोलकातातील ईडन गार्डवर आढळला स्टाफ कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 12:05 PM2023-12-18T12:05:58+5:302023-12-18T12:08:10+5:30
स्टेडियमवरील कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी ८ वाजता मृतदेह मैदानावरील के. ब्लॉकवर लटकल्याचे आढळून आले
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील ईडन गार्डनवर एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. स्टेडयमच्या के. ब्लॉकवर हा मृतदेह लटकवलेला दिसून आला. मृत व्यक्ती ग्राऊंड स्टाफच्या कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलं असून पुढील तपास सुरू आहे. धनंजय बारीक (वय २१) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो मूळ ओडिशातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
स्टेडियमवरील कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी ८ वाजता मृतदेह मैदानावरील के. ब्लॉकवर लटकल्याचे आढळून आले. त्यावेळी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ कोलकाता पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन एसएसकेएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. सध्या, मैदानातील सर्वच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे.
मृत व्यक्ती येथील स्टाफ क्वॉर्टरमध्ये आपल्या वडिल आणि काकांसोबत राहत होता. तो ओडिशातून येथे राहायला आला होता, तसेच नोकरीचा शोधही घेत होता. ग्राऊंड स्टाफ म्हणून नोकरी करण्यासही तो इच्छुक होता, पण त्यास ग्राऊंडस्टाफची नोकरी मिळाली नाही, अशी माहिती मिळत आहे.