अंधेरीत फ्लाइट अटेंडंट तरुणीचा मृतदेह सापडला, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 12:18 PM2023-09-04T12:18:18+5:302023-09-04T12:18:39+5:30
ओग्रेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचेही अधिकारी म्हणाले.
मुंबई : सोमवारी पहाटे अंधेरी येथील एका फ्लॅटमध्ये संशयास्पद स्थितीत फ्लाइट अटेंडंट रुपल ओग्रे (२४) नामक तरुणीचा मृतावस्थेत सापडला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेण्यासाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
ओग्रेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचेही अधिकारी म्हणाले. ती मरोळच्या टाटा पॉवर सेंटर बस स्थानकाजवळ असलेल्या एन जी कॉम्प्लेक्स येथील फ्लॅटमध्ये राहत होती. याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित महिला प्रशिक्षणार्थी एअर होस्टेस म्हणून काम करते. ती मूळची छत्तीसगडची असून एअर इंडियामध्ये प्रशिक्षणासाठी ती एप्रिलमध्ये मुंबईत आली होती. ज्या फ्लॅटमध्ये ती मृतावस्थेत आढळली, त्या फ्लॅटमध्ये ती तिची बहीण आणि बहिणीच्या प्रियकरासह राहत होती.
हे दोघेही वैयक्तिक कामानिमित्त आठ दिवसांपूर्वी त्यांच्या मूळ गावी गेले होते. पोलिसांनी त्यांना सोमवारी सकाळी या घटनेची माहिती दिली आणि आता ते मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत.
कुटुंबीयांना अखेरचा व्हिडिओ कॉल !
पीडित ओग्रेचे रविवारी सकाळी तिच्या कुटुंबीयांशी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर शेवटचे बोलणे झाले होते. त्यामुळे रविवारी दुपार ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान हा खून झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.