फिरायला गेलेल्या कशेळीच्या वृद्धाचा मृतदेह मिळाला ठाण्याच्या तलावात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 03:44 PM2021-10-10T15:44:52+5:302021-10-10T15:45:21+5:30
आत्महत्येचीही शक्यता: नौपाडा पोलीस ठाण्यात नोंद
लोेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: शनिवारी घरातून फिरायला गेलेल्या कशेळी येथील ७५ वर्षीय विठ्ठल गोविंद देशमुख या वृद्धाचा मृतदेह ठाण्याच्या कचराळी तलावामध्ये रविवारी सकाळी आढळला. या तलावात त्यांनी आत्महत्या केली की ते तोल जाऊन पडले, याबाबत मात्र तर्कवितर्क केले जात असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. भिवंडीतील कशेळी भागात राहणारे देशमुख हे पूर्वी ठाण्यातील पाचपाखाडी भागात वास्तव्याला होते.
नेहमीप्रमाणे ९ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घराबाहेर फिरण्यासाठी बाहेर पडले होते. दुपारी एक वाजेपर्यंत घरी परतणारे वडिल घरी न आल्यामुळे देशमुख यांच्या मुलांनी नारपोली पोलीस ठाण्यात याबाबत ते हरविल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, १० आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह पाचपाखाडीतील कचराळी तलावात तरंगतांना आढळला. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि नौपाडा पोलिसांनी याठिकाणी बचावकार्य राबवून हा मृतदेह बाहेर काढला. या मृतदेहाच्या पॅन्टच्या खिशातील प्लास्टीकच्या पाकिटातील एका डायरीच्या आधारे त्यांची ओळख पटली. त्यांना दोन मुले, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. नेहमी फिरायला जाणारे देशमुख हे त्यांच्या पाचपाखाडीतील जुन्या घरीही नेहमी येत असत. ते कशेळीतीन ओंकार गॅलेक्सी या इमारतीमध्ये वास्तव्याला होते. ते कचराळी तलावात नेमकी कसे पडले? याचा मात्र उलगडा झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक योगेश लामखेडे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.