रक्ताच्या थारोळ्यात आढळला वृद्धेचा मृतदेह; हत्येचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 10:27 AM2021-03-11T10:27:42+5:302021-03-11T10:28:04+5:30
Murder in Akola पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त केला असून, मृत वृद्धेच्या मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
अकोला: खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जुन्या आरटीओ रस्त्यावरील स्वप्नशिल्प अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर एका ६० वर्षीय वृद्धेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त केला असून, मृत वृद्धेच्या मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुन्या आरटीओ रोडवरील हनुमान मंदिराच्या पुढे असलेल्या स्वप्नशिल्प अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर ६० वर्षीय सरोबाई कांडेलकर आणि तिची विधवा मुलगी कविता बावसकर (४०) या राहतात. कविताचा मुलगा पुणे येथील एका इंजिनीअरींग कॉलेजचा विद्यार्थी आहे. दरम्यान, बुधवारी रात्रीच्या सुमारास स्वयंपाक खोलीत सरोबाई कांडेलकर यांचा मृृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच खदान स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. सी. खंडेराव आणि पोलिसांच्या गुन्हे शाखेचे शैलेश सपकाळ हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले होते. याप्रकरणी सध्या कलम १७४ आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त करीत मृत महिलेच्या मुलीस चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मृत महिलेचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती आहे.
शवविच्छेदन अहवालात होणार स्पष्ट
मुलीसोबत राहणारी सरोबाई कांडेलकर फ्लॅटच्या स्वयंपाक घरातील फरशीवर रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तिच्यासोबत फ्लॅटमध्ये मृत महिलेची मुलगी आढळून आली असून, सध्या तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असून, पुढील कारवाई केली जाणार आहे.
डी. सी. खंडेराव, पोलीस निरीक्षक, खदान पोलीस स्टेशन.