साताऱ्यात खळबळ! पालिकेच्या कृत्रिम तळ्यात वृद्धेचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 06:50 PM2021-10-04T18:50:15+5:302021-10-04T18:50:31+5:30
Satara Crime news: संबंधित महिला ही रविवारी रात्री पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी गेली असावी, त्यानंतर तिचा तोल जाऊन ती पाण्यात पडली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राधिका रस्त्यावर गणेश विसर्जनासाठी खोदण्यात आलेल्या कृत्रिम तळ्यामध्ये पडून एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली असून, संबंधित महिलेची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती.
याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित वृद्ध महिला ही शहरातून भीक मागत फिरत होती. तिला अनेकदा पोलिसांसह नागरिकांनीही पाहिले आहे. सोमवारी सकाळी त्या महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना काही नागरिकांच्या निर्दशनास आला. त्यानंतर नागरिकांनी शाहूपुरी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
संबंधित महिला ही रविवारी रात्री पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी गेली असावी, त्यानंतर तिचा तोल जाऊन ती पाण्यात पडली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या घटनेची शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, महिला पोलीस हवालदार मीना गाढवे या अधिक तपास करत आहेत.