एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू, ठाण्यात येऊरच्या नील तलावात आणखी दोघे बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 05:28 PM2021-06-21T17:28:35+5:302021-06-21T17:29:14+5:30
Drowning Case : एकाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ठाणे: येऊरच्या पटोणापाडा येथील नील तलावात रविवारी वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये दोघे बुडाले असताना, त्या घटनांना २४ तास होत नाही तोच सोमवारी सकाळी आणखी दोघे जण त्याच नील तलावात बुडाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यातील एकाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वर्तकनगर आणि समतानगर येथील तेजस प्रमोद चोरगे (१७) आणि ध्रुव कुळे (१७) तसेच त्याचे हिमांशू वाघ, सोहम करंदीकर, दीप म्हात्रे,आर्यन कलगुटकर, अथर्व आवते असे सात जण येऊरच्या नील तलावात सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. तेथे पोहत असताना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तेजस आणि ध्रुव या दोन मित्रांना पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठामपा आपत्ती आणि अग्निशमन या विभागासह वन विभाग आणि वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या दोघांच्या मृतदेहाचा शोध घेण्यास सुरुवात केल्यावर अडीच वाजण्याच्या सुमारास तेजस याचा मृतदेह मिळाला. तो मृतदेह पोलिसांच्या उपस्थितीत शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे, तसेच ध्रुव याच्या मृतदेहाचे शोधकार्य सुरू आहे. अशी माहिती आपत्ती कक्षाप्रमुख संतोष कदम यांनी दिली.