कोरोनाबाधित महिलेचा रुग्णालयातील स्वच्छतागृहात आढळला मृतदेह; राज्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 02:21 PM2020-06-10T14:21:15+5:302020-06-10T14:24:29+5:30
कोरोनाच्या रुग्णालयातून २ जूनपासून ही महिला बेपत्ता होती.
जळगाव : भुसावळ येथील बेपत्ता झालेल्या ८२ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णालयाच्या स्वच्छता गृहात ही महिला मृतावस्थेत आढळली. त्यामुळे या रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मालती चुडामण नेहते असे या महिलेचे नाव आहे.
कोरोनाच्या रुग्णालयातून २ जूनपासून ही महिला बेपत्ता होती. या महिलेच्या नातेवाईकांनी शनिवारी सायंकाळी पोलिसात तक्रार दिली होती. १ जून रोजी त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना भुसावळ येथील रेल्वेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जळगावच्या कोरोना रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. भुसावळ येथून त्यांचे नाव चुकीचे पाठवण्यात आल्याने कोरोना रुग्णालयात त्यांच्या नावाची नोंद मालती सुदाणे अशी झाली आहे.
पुन्हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून रोजी ही महिला बेपत्ता असल्याची माहिती त्यांना येथील डॉक्टरांनी दिली होती. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी आपण चुकून त्यांना संशयितांच्या कक्षात दाखल केले होते, असे सांगितले. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी नातेवाईकांनी फोन केला असता त्या बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र त्या कुठेच सापडल्या नाहीत.
विशेष म्हणजे त्यांचा मृतदेह त्याच रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात सापडावा अन् दुर्गंधी येईपर्यंत त्याबाबत कुणाला काहीच कळू नये, यामुळे जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.