कौशल्य विकास प्रशिक्षण निधी लाटण्यासाठी बोगस केंद्र; बीडच्या १० संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 03:25 PM2019-12-12T15:25:28+5:302019-12-12T15:31:11+5:30

अधिकृत संस्थांना शासनाकडून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १५ हजार रुपयांचा निधी दिला जातो.

Bogus Center to kick off the Skill Development Training Fund; FIR against 10 organizations of Beed | कौशल्य विकास प्रशिक्षण निधी लाटण्यासाठी बोगस केंद्र; बीडच्या १० संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

कौशल्य विकास प्रशिक्षण निधी लाटण्यासाठी बोगस केंद्र; बीडच्या १० संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देविकास प्रशिक्षण संस्था कागदावरच

- मनीषा म्हात्रे

मुंबई/बीड : राज्य शासनाचा कौशल्य विकास प्रशिक्षण निधी लाटण्यासाठी बीडमध्ये कंत्राटी अधिकाऱ्याला हाताशी धरून १० बोगस प्रशिक्षण संस्था थाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार, संबंधित संस्थांविरुद्ध महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबईचे संतोष  राऊत (३८) यांच्या तक्रारीवरुन सोमवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी ही जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंद्रांमार्फत शासनाच्या सर्व कौशल्य विकास योजना पार पाडत असते. या सर्व कामात महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंदे्र ही ‘महास्वयम’ या शासकीय पोर्टलवरुन जोडण्यात आली आहे. सदरचे पोर्टल हे सिल्वर टच या संस्थेद्वारे बनविण्यात आले असून त्याचे समायोजन देखील त्यांच्याकडून करण्यात येते. या पोर्टलद्वारे सदर योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व खासगी तसेच शासकीय संस्था या नोंदणी करत असतात. नोंदणी झाल्यानंतर अधिकृत संस्थांना शासनाकडून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १५ हजार रुपयांचा निधी दिला जातो. हाच निधी लाटण्यासाठी बीडमधील १० संस्थांनी पोर्टलच्या कंत्राटदारास हाताशी धरून बनावट केंद्र उघडली. 

शासकीय संकेतस्थळावरूनच त्यांना मान्यता देण्यात आल्याचे समोर येताच, संकेतस्थळाची जबाबदारी सोपविलेल्या सिल्वर टचकडे चौकशी केली. त्यातून, ४ नोव्हेंबर २०१८ रोजी हा व्यवहार केल्याचे समोर आले. सुट्टीच्या दिवशीच कंत्राटी कौशल्य विकास अधिकारी २  तौसीफ शेख यांचे लाँग ईन क्रेडेनशियल्सचा वापर करून  या संस्थाना मान्यता दिल्याचे सिल्वर टचकडून सांगण्यात आले. याबाबतचा अहवाल कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे अप्पर मुख्य सचिवांकडे हा अहवाल पाठविण्यात आला. त्यानुसार,  चौकशीअंती त्यांच्या आदेशाने अखेर, राऊत यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. आझाद मैदान पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. संबंधित संस्थानी आतापर्यंत किती निधी लाटला? यात कुणा कुणाचा समावेश आहे, आदींबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक (गुन्हे) रमेश यादव यांनी सांगितले.

विकास प्रशिक्षण संस्था कागदावरच
३१ आॅक्टोबर रोजी राऊत यांच्याकडे अशा संस्थाच्या तपासणीबाबत सांगण्यात आले. त्यानुसार, त्यांनी १८, १९ आॅक्टोबर रोजी बीड शहर, माजलगाव व परळी येथे जात तपासणी सुरु केली. संबधित पत्त्यांवर विकास प्रशिक्षण संस्थाच अस्तित्वातच नसल्याचे समोर आले. त्यानुसार बीडमधील ग्लोबल अकडमी, विद्यासागर, सहयोग स्कील, अभिनंदन कम्प्युटर्स, नमनल स्कील अकॅडमी, प्रतिभा, यश स्किल, गॅलेक्सी, अचिवर्स, अ‍ॅपेक्स संस्थांचा यात समावेश आहे. 

Web Title: Bogus Center to kick off the Skill Development Training Fund; FIR against 10 organizations of Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.