भिवंडीत बोगस डॉक्टर पतिपत्नीला अटक
By नितीन पंडित | Published: December 27, 2022 05:50 PM2022-12-27T17:50:44+5:302022-12-27T17:52:38+5:30
मोमीन मुशर्रफ नूर मोहम्मद अशरफी वय ४६ व रायला मुशर्रफ मोमीन वय ४० असे अटक कारवाई झालेल्या बोगस डॉक्टर पतीपत्नीचे नाव आहे.
नितीन पंडित
भिवंडी: भिवंडी या कामगार वस्तीच्या शहरात असंख्य झोपडपट्टी विभागांमधून बोगस डॉक्टर सर्रासपणे सर्वसामान्य नागरिकांवर औषध उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळ करीत आहेत. असे असताना याबाबत अनेक तक्रारी महानगर पालिका आरोग्य विभागाकडे होत असतात. सोमवारी एका तक्रारीनंतर भिवंडी शहरातील हमाल वाडा या परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोघा पती-पत्नीवर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी यांनी गुन्हा दाखल केला आहे.मोमीन मुशर्रफ नूर मोहम्मद अशरफी वय ४६ व रायला मुशर्रफ मोमीन वय ४० असे अटक कारवाई झालेल्या बोगस डॉक्टर पतीपत्नीचे नाव आहे.
वरील दोघे बोगस डॉक्टर स्वतः कडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसून मेडीकल कौन्सीलकडे नोंदणी नसताना त्यांनी आवामी इमदादी क्लिनीक उघडून त्या ठिकाणी नागरिकांवर उपचार करीत होते.दिनांक १ ते १० ऑगष्ट २०२२ दरम्यान या बोगस डॉक्टरांनी तनवीर गुलाम मुस्तफा मोमीन वय ५२ यांच्या वर या बोगस डॉक्टरांनी दवाउपचार करीत वेगवेगळया वैद्यकीय तपासण्या करायला भाग पाडून चुकीचे पध्दतीने दवा उपचार केल्याने त्यामध्ये तनवीर गुलाम मुस्तफा मोमीन यांचा मृत्यू झाला होता.या बाबत पालिका आरोग्य विभागाकडे तक्रार आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ शमीम सलाम अन्सारी यांनी चौकशी केली असता ते कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवू न शकल्याने ते बोगस डॉक्टर असल्याने त्यांच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी या बोगस डॉक्टर असलेल्या पतिपत्नी विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे .या गिन्ह्याचा अधिक तपास पोउप निरी एस.एम.घुगे हे करीत आहेत.