खामगावचा बोगस डॉक्टर नांदुर्यात अडकला जाळ्यात, अपर पोलीस अधिक्षक पथकाची धाडसी कारवाई!

By अनिल गवई | Published: December 17, 2023 04:29 PM2023-12-17T16:29:10+5:302023-12-17T16:30:14+5:30

डॉक्टरविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून रोख आणि मुद्देमाल असा एकुण एक लाख ६८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Bogus doctor of Khamgaon is trapped in Nandura, brave action of the Additional Police Superintendent team! | खामगावचा बोगस डॉक्टर नांदुर्यात अडकला जाळ्यात, अपर पोलीस अधिक्षक पथकाची धाडसी कारवाई!

खामगावचा बोगस डॉक्टर नांदुर्यात अडकला जाळ्यात, अपर पोलीस अधिक्षक पथकाची धाडसी कारवाई!

बुलढाणा: खामगाव तालुक्यातील एका बोगस डॉक्टरला नांदुरा येथील एका हॉटेलात औषधोपचार आणि रूग्णांची तपासणी करताना रंगेहात पकडण्यात आले. अपर पोलीस अधिक्षकांच्या पथकाने पाळत ठेऊन ही धाडसी कारवाई केली. यात डॉक्टरविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून रोख आणि मुद्देमाल असा एकुण एक लाख ६८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, खामगाव तालुक्यातील अंबिकापूर चितोडा येथील शेख युसुफ शेख शौकत हा नांदुरा येथील एका हॉटेलात कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त नसताना औषधोपचार आणि रूग्ण तपासणी करीत असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधिक्षकांना मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर आरोपी डॉक्टरविरोधात अपर पोलीस अधिक्षक पथकाने सापळा रचला. 

दरम्यान, शनिवारी नांदुरा येथील हॉटेल दीपकमध्ये छापा मारला असता आरोपी डॉ. शे. युसफु हा रूग्णांना विविध औषधी देताना आढळून आला. त्याच्या जवळून विविध प्रकारची द्रव आणि भुकटी स्वरूपातील ६४ हजार रूपयांची औषधी (प्रत्येकी ३२०० रूपये किंमतीचे ३० बॉक्स),  दोन हजार रूपयांची भुकटी स्वरूपातील औषधी तसेच इतर औषधी, रोख २८०० रूपये, एक लाख रूपये किंमतीची एमएच ०२ सीएच १७२९ या क्रमांकाची जुनी चारचाकी कार असा एकुण एक लाख ६८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

आरोपी  विरोधात नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. ल.अ. जयस्वाल यांच्या तक्रारीवरून  वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम १९६१ कलम ३३,३८ वैद्यकीय व्यावसायीक अधिनीयम २००० चे कलम ३३ (१), तसेच औषधी द्रव्ये, तिलस्मी उपचार (आक्षेपार्ह जाहीराती) अधिनीयम १९५४ चे कलम ४ आणि ७ अन्वये नांदुरा पोलीसांत रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. अपर पोलीस अधिक्षक अशाेक थोरात यांच्या मार्गदर्शनात एपीआय सतीश आडे, श्रीकृष्ण नारखेडे, शिवशंकर वायाळ यांनी ही कारवाई केली. 

आक्षेपार्ह दस्तवेजही जप्त
आरोपी डॉ. शेख युसुफ शेख शौकत यांच्याकडून इंडियन कौन्सील ॲन्ड बी होमिओपॅथी सिस्टीम ऑफ एमईडी असे हेडींग असलेले प्रमाणपत्र क्रमांक १००७ व रजिस्ट्रेशन दिनांक ३० एप्रिल १९९४ रजीस्ट्रशन नंबर १२४७०/१९८८ आढळले. त्याच्या आधारकार्डावर ०२ जून १९७८ अशी जन्मतारीख आढळून आली. त्यामुळे जन्म तारीख आणि प्रमाणपत्रावरील तारीख यावरून त्याने केवळ १६ वर्षांचा असताना प्रमाणपत्र मिळवल्याचे आढळले. त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला. 

मुळप्रमाणपत्र देण्यास नकार 
आरोपी डॉक्टर मान्यता प्राप्त असलेल्या विद्यापिठाच्या सुचिमध्ये नमुद असलेल्या विद्यापिठाचे कोणत्याही प्रकारची नोंदणी व वैद्यकीय अर्हता प्रमाणपत्र नसुन शासनाचा औषध विक्रीचा कोणताही परवाना नसल्याचेही पोलीस तपासात आढळून आले. त्याचवेळी आरोपीने यावेळी मुळप्रमाणपत्र देण्यास स्पष्ट नकार दिल्याचे पोलीस सुत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: Bogus doctor of Khamgaon is trapped in Nandura, brave action of the Additional Police Superintendent team!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.