जितेंद्र आव्हाड यांचे बोगस फेसबुक अकाउंट; एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 01:03 AM2020-12-22T01:03:20+5:302020-12-22T01:03:44+5:30
Jitendra Awhad : बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यास वापरलेला मोबाइल जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे शिवीगाळ करून आव्हाड यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो फेसबुकवर प्रसारित करणाऱ्या सुनील रायभान पवार उर्फ सुनील राजे पवार (२८, रा. औरंगाबाद) याला औरंगाबाद येथून ठाणे गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून मोबाइलही जप्त केला आहे.
याबाबत ८ एप्रिल रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सायबर सेलचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण वाघ, पोलीस नाईक अनुरोध गावित, कॉन्स्टेबल विजयअमर खरटमल, रवींद्र घोडके, गंगाधन तीर्थंकर, राजकुमार राठोड आणि सुजीतकुमार तायडे आदींच्या पथकाने १८ डिसेंबर रोजी औरंगाबाद क्रांतिनगर सिडको येथून सुनील याला अटक केली. त्याला ठाणे न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यास वापरलेला मोबाइल जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.