बोगस आयकर अधिकाऱ्यांची गॅंग पोलिसांनी केली जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 08:14 PM2019-06-15T20:14:03+5:302019-06-15T20:16:07+5:30
दहिसर पोलिसांनी शिताफीने तपास करून त्या भामट्यांच्या मुसक्या आवळल्या.
मुंबई - आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून एका व्यापाऱ्याच्या घरातून रोकड व महागडे मोबाईल असा ८० लाख ४० हजारांचा मुद्देमाल घेऊन १३ जणांची टोळी पसार झाली होती. मात्र, दहिसर पोलिसांनी शिताफीने तपास करून त्या भामट्यांच्या मुसक्या आवळल्या.
दहिसर येथील ओवरी पाडय़ात राहणारे किसन बेलवटे या व्यापाऱ्याच्या घरी ८ जूनच्या पहाटे १३ जणांची टोळी आली होती. आम्ही आयकर अधिकारी आहोत, तुम्ही घरात भरपूर पैसे बेकायदेशीरपणे लपवून ठेवले आहेत. जप्तीसाठी ते पैसे बाहेर काढा आणि कारवाईसाठी तयार रहा असे घाबरवण्यास सुरुवात केली. आरोपींनी ओळखपत्र देखील दाखवल्याने बेलवटे घाबरले. मग त्यांनी घरात ठेवलेली ८० लाख ४० हजारांची रोकड काढून दिली. त्यानंतर त्यांनी आयकर विभागाची कागदपत्रे असल्याचे भासवून त्यावर बेलवटे यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आणि चौकशीसाठी ऑफिसला अशी बतावणी करून निघून गेले. परंतु, त्यांच्या हालचाली बेलवटे यांना खटकल्यामुळे त्यांनी शेजारी राहणाऱ्या दीपक शहा यांना घडलेला प्रकार सांगून दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत पिंगळे, पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, गोरखनाथ घार्गे, उपनिरीक्षक चंद्रकांत घार्गे, श्रीकांत मगर, शिवाजी चोरे, संदीप शेवाळे आदींच्या पथकाने तपास सुरू केला आणि आरोपींची टोळी जेरबंद केली.