धक्कादायक! जमिनीच्या वादातून १५-२० जणांनी घराची तोडफोड केली अन् महिलेला जिवंत जाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 07:02 PM2023-10-19T19:02:24+5:302023-10-19T19:08:59+5:30
या खळबळजनक घटनेने परिसरात घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
झारखंडमधील बोकारो येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जमिनीच्या वादातून आरोपींनी एका महिलेवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. घटनेत महिला गंभीररित्या जखमी झाली. त्यानंतर तिला बोकारो जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेने परिसरात घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
ही घटना बोकारोच्या माराफारी पोलीस स्टेशन हद्दीतील बांसगोडा येथे घडली. १५-२० लोक पीडित महिला अमिषा परवीन यांच्या घरी आले आणि त्यांनी घरावर हल्ला आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. घरावर हल्ला झाला तेव्हा अमिषा या उपस्थित नव्हत्या. हल्ल्याची माहिती मिळताच त्या घरी पोहोचल्या, तेव्हा आरोपींनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपींनी भरदिवसा अमिषा यांच्यावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले.
या घटनेची माहिती मिळताच मुलगा मुजाब अली याने आई अमिषा यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचे दोन्ही हातही भाजले.अमिषा यांना पेटवून दिल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. अमिषा यांच्या आरडाओरडामुळे लोकांची गर्दी झाली. आगीत गंभीर भाजलेल्या अमिषा यांना तातडीने जवळच्या हॉस्पिटल दाखल करण्यात आले. अमिषा यांची गंभीर स्थिती पाहून त्यांना बोकारो जनरल हॉस्पिटलच्या बर्न वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. ८० टक्क्यांहून अधिक भाजल्यामुळे अमिषा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
भरदिवसा अमिषा यांना पेटवून दिल्याच्या घटनेने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी पीडित अमिषा परवीन यांचा जबाब नोंदवला. तसेच, या प्रकरणाचा तपास माराफरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
घराच्या जमिनीवरून वाद
पीडित अमिषा यांचा मुलगा मुजाब अली याने सांगितले की, ते राहत असलेल्या घराच्या जमिनीवरून करमा मांझी यांच्याशी वाद सुरू आहे. याबाबत अनेकदा पंचनामेही झाले. करमा मांझीकडून अमिषा परवीन यांच्यावर जमीन रिकामी करण्यासाठी दबाव आणला जात होता. बुधवारी दुपारी अनेकांनी जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसून तोडफोड केली. त्यानंतर आरोपींनी आईला पेटवून दिल्याचा आरोप मुजाब अलीने केला आहे.