Saif Ali Khan Knife Attack: पाईपवरून बेडरुममध्ये शिरला, मोलकरणीशी वाद, मग सैफ अली खानवर चाकू हल्ला; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 10:05 IST2025-01-16T09:58:41+5:302025-01-16T10:05:44+5:30
सैफला ६ ठिकाणी जखमा झाल्यात, त्यात गळ्यावर वार झाले, त्यातील एक मणक्याजवळ गंभीर हल्ला झाला आहे.

Saif Ali Khan Knife Attack: पाईपवरून बेडरुममध्ये शिरला, मोलकरणीशी वाद, मग सैफ अली खानवर चाकू हल्ला; नेमकं काय घडलं?
मुंबई - बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला झाला आहे. बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात घुसला आणि त्याने अभिनेत्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यानंतर सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सैफ अली खानच्या शरीरावर ६ जखमा असून त्याची सर्जरी करण्यात आली आहे. आता मुंबई पोलिसांकडून या हल्ल्याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय सैफ अली खानच्या कुटुंबाने दिलेले निवेदन पुढे आले आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात घुसला तिथे मोलकरणीसोबत त्याचा वाद झाला. दोघांमधील वाद सुरू असतानाच अभिनेता सैफ अली खान तिथे आला तेव्हा त्या व्यक्तीने काही कळण्याच्या आत सैफवर चाकूने हल्ला केला. जवळपास २-३ वार सैफला लागले. दोघांमध्ये झटापट झाली असं त्यांनी सांगितले. तर सैफच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या हॉस्पिटलमध्ये सैफवर सर्जरी सुरू आहे. हे प्रकरण पोलिसांकडे आहे. आम्ही तुम्हाला वेळोवेळी अपडेट देऊ असं सैफच्या पीआर टीमकडून कळवण्यात आले आहे.
सैफला ६ ठिकाणी जखमा झाल्यात, त्यात गळ्यावर वार झाले, त्यातील एक मणक्याजवळ गंभीर हल्ला झाला आहे. सैफ अली खानवर ऑपरेशन सुरू असून तिथे प्लास्टिक सर्जन आणि न्यूरो सर्जनही उपस्थित आहेत. सैफ अली खानच्या मोलकरणीलाही या झटापटीत लागले आहे. त्यादेखील किरकोळ जखमी झाल्या आहेत.
सैफच्या घरात कसा घुसला चोर?
सूत्रांनुसार, सैफ अली खानच्या घराशेजारी एक पाईपलाईन आहे जी बेडरूमपर्यंत जाते. सुरुवातीच्या तपासात चोर घरात तिथूनच घुसल्याची शंका आहे. करीनानं मोलकरीण आणि चोर यांच्यातील भांडणाचा आवाज ऐकला आणि उठली. त्यानंतर कुटुंबाला वाचवण्यासाठी सैफने चोराला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यात चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि तिथून पळून गेला. या घटनेनंतर तात्काळ सैफला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेवेळी संपूर्ण कुटुंब घरातच होते. करीना आणि दोन्ही मुले तिथेच होती.
दरम्यान, सैफ अली खानवर वांद्रे येथील घरात अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केला. पहाटे ३.३० च्या सुमारास सैफला रुग्णालयात आणले गेले. त्याच्यावर ६ वार करण्यात आलेत त्यातील २ गंभीर आहेत. त्यातील एक मणक्याजवळ आहे. सैफवर न्यूरोसर्जन, कॉस्मेटिक सर्जन यांच्या नेतृत्वात डॉक्टरांची टीम ऑपरेशन करत आहे. सैफवरील हल्ल्यानंतर ४.३० वाजता करीना कपूर खान त्यांची बहीण करिश्मा कपूर यांच्यासोबत हॉस्पिटलला पोहचल्या अशी माहिती लीलावती रुग्णालयाने निवेदनात दिले आहे.