बॉलीवूडवर चौकशीचा ‘अमल’, मोठमोठ्या अभिनेत्री अडकल्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 06:46 AM2020-09-26T06:46:54+5:302020-09-26T06:47:19+5:30
ड्रग्ज कनेक्शन : दीपिकासह सारा, श्रद्धा कपूरचीही होणार चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी नामांकित अभिनेत्रींची नावे समोर आल्याने अवघे बॉलीवूड हादरले आहे. दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या तीन आघाडीच्या अभिनेत्रींची शनिवारी एनसीबी चौकशी करणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमली पदार्थ नियंत्रक विभागाने (एनसीबी) बुधवारी दीपिका, सारा, श्रद्धा व रकुल प्रीत सिंग यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार, शुक्रवारी रकुलची चौकशी झाली.
दीपिकाच होती ‘त्या’ ग्रुपची अॅडमिन;
त्याबद्दल एनसीबी करू शकते विचारणा
अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर, क्वॉन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाशची एनसीबीने आज सुमारे सात तास चौकशी केली. दीपिका आणि करिश्मा प्रकाश यांच्या व्हायरल झालेल्या २०१७ च्या ड्रग्ज चॅट ग्रुपची दीपिकाच अॅडमिन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, शनिवारी एनसीबी दीपिकाकडे चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रणवीरने दीपिकासोबत येऊ देण्याची विनंती केली नाही - एनसीबी
घाबरल्यामुळे दीपिकाला पॅनिक अटॅक येऊ शकतो म्हणून दीपिकाच्या चौकशीवेळी तिच्यासोबत राहण्यासाठी पती, अभिनेता रणवीर सिंगने विनंती केल्याचे वृत्त दिवसभर चर्चेत होते. मात्र, रणवीरने कोणतीही लिखित किंवा तोंडी विनंती केलेली नाही, असे एनसीबीने स्पष्ट केले. त्यामुळे चौकशीवेळी रणवीर दीपिकासोबत नसेल, हे स्पष्ट झाले आहे.
अभिनेत्री रकुल म्हणते...
रिया माझ्या घरी ड्रग्ज ठेवत असे, मी सेवन केले नाही!
एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर शुक्रवारी सकाळी अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने एनसीबी कार्यालयात हजेरी लावली. एनसीबीने तिची चार तास चौकशी केली. यावेळी व्हायरल झालेल्या व्हॉट्सअॅप ड्रग्ज संवादाबाबत तिने कबुली दिली. आपण स्वत: कधीच ड्रग्ज घेतले नसून, रियाच माझ्या घरी ड्रग्ज ठेवत असल्याचे सांगितले. त्यामुळे रियाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
हे तर पार्शियल हँगिंग : सीएफएसएलचा अहवाल
सुशांतसिंह याचा पूर्णपणे फास लावून नव्हे तर अर्धवट स्थितीतील फास लागल्याने (पार्शियल हँगिंग) मृत्यू झाला आहे, असा निष्कर्ष सेंट्रल फॉरेन्सिक सायंटिफिक लॅबोरेटरी (सीएफएसएल) च्या अहवालात काढण्यात आला आहे.