बॉलीवूडमधील बडा ड्रग्ज पेडलर एनसीबीच्या जाळ्यात; १ किलो चरससह साडेचार लाखांची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 02:06 AM2020-09-19T02:06:24+5:302020-09-19T06:24:23+5:30
एनसीबीन बॉलीवूड किंवा मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा (बड/गांजाचे प्रतिनाम) विकणाऱ्या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार, कैझान इब्राहिमला नुकतीच अटक केली.
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी बॉलीवूडमधील बडा ड्रग्ज पेडलर राहिल विश्राम एनसीबीच्या जाळ्यात अडकला. हिमाचल प्रदेशमधून त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्याकड़ून ४ कोटींच्या एक किलो चरससह साडेचार लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. बॉलीवूडमधील सेलिब्रिटींसोबत त्याचे थेट संबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एनसीबीन बॉलीवूड किंवा मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा (बड/गांजाचे प्रतिनाम) विकणाऱ्या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार, कैझान इब्राहिमला नुकतीच अटक केली. या पाठोपाठ अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह तिचा भाऊ शोविकला, तसेच सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत, सूर्यदीप मल्होत्रा, अंकुश अर्नेजा, क्रिस कोस्टासह आणखी काही जणांनाही ड्रग्ज कनेक्शनमध्ये अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून राहिलबाबत माहिती मिळाली.
त्यानुसार, एनसीबी मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात एक पथक हिमाचलला रवाना झाले. त्यांनी गुरुवारी राहिलला ताब्यात घेत, शुक्रवारी पहाटेपर्यंत चौकशी केली. त्याच्या मुंबईतील घरी वर्सोवा येथे छापा टाकला. सुमारे ४ कोटींच्या एक किलो चरससह साडेचार लाखांची रोकड जप्त केली.
राहिल या प्रकरणातील मोठे नाव असून, तो थेट अनेक बड्या सेलिब्रिटींना ड्रग्जचा पुरवठा करत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याने तपासात अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीत त्याचा बॉस बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या सेलिब्रिटींना हिमाचल प्रदेशमध्ये मलाना क्रिम म्हणून प्रसिद्ध असलेल्या चरसचा पुरवठा करण्याचे नेटवर्क चालवत आहे. त्यानुसार, तपास पथक त्याच्या बॉसच्या शोधात आहे.
वर्सोवा, पवई, ठाण्यात छापा, आणखी तिघे ताब्यात
- एनसीबीने १३ सप्टेंबरला अटक केलेल्या अंकुश अर्नेजाच्या जबाबातून राहिलचे नाव समोर आले. त्याच्या कारवाईपाठोपाठ, रोहन तलवार नावाच्या ड्रग पेडलरला त्यांनी ताब्यात घेतले. त्याच्या घरातून १० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तलवारच्या चौकशीतून नॉगथॉन एनसीबीच्या जाळ्यात सापडला. त्याच्याकड़ून तब्बल ३७० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
- नॉगथॉनने त्याचा साथीदार अशोक सालवेबाबत माहिती दिली. त्यानुसार, पथकाने साळवेला ताब्यात घेऊन त्याच्याकड़ून ११० ग्र्रॅम गांजा जप्त केला. वर्सोवा, पवई आणि ठाण्यात केलेल्या करवाईतून हा ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला. ही मंडळी प्रतिग्रॅम ६ ते ८ हजार रुपयांत ड्रग्जची विक्री करत होते.