बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत; ‘हवाईयन थीम’वर तीन दिवस रंगणार होती रेव्ह पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 05:29 PM2021-06-28T17:29:35+5:302021-06-28T17:32:30+5:30
Rave Party Busted by Police : सव्वा लाखांचा मद्यसाठा जप्त; न्यायालयाने हिना पांचालसह सर्वांना सुनावली पोलीस कोठडी
नाशिक : बॉलिवुडशी संबंधित दोन कोरिओग्राफर अन् अभिनेत्रींचा सहभाग असलेल्या २२व्यक्तींच्या समुह इगतपुरीतील दोन आलिशान बंगल्यांमध्ये थेट तीन दिवसांच्या मुक्कामाला आलेला होता. या हायप्रोफाईल नशेबाजांच्या समुहाने ‘हवाइयन’ संकल्पनेवर अधारित तीन दिवसीय रेव्ह पार्टीचा बेत आखला होता, अशी धक्कादायक बाब सोमवारी (दि.२८) समोर आली आहे. अभिनेत्री हिना पांचालसह अन्य ११ महिला आणि सहा पुरुषांना एक दिवसाची तर चौघा पुरुषांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
इगतपुरीचा परिसर मुंबईकरांनाही जवळ आहे. कसारा घाट चढून आल्यानंतर इगतपुरी वाटेत लागते. येथील स्काय ताज व्हीला, स्काय लगून व्हीला या दोन खासगी बंगल्यात संशयित पियूष सेठीयाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तब्बल पाच दहा नव्हे तर एकुण १० पुरुष आण १२ महिला असे २२ जण एकत्र येऊन शुक्रवारपासून रेव्ह पार्टीत रंगले होते. ही 'रेव्ह पार्टी' साधीसुधी मुळीच नव्हती. हा सगळा बेत एका 'हवाईयन पार्टी'च्या धर्तीवर आखला गेला होता, असे पोलिसांनी सांगितले. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली आणि त्यांनी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साध्या पोशाखात पोलिसांचा लवाजमा घेत शनिवारी मध्यरात्री या बंगल्यांवर छापा मारत हायप्रोफाईल पार्टी उधळून लावली. येथून २२ संशयितांना पोलिसांनी अटक करुन अंमली पदार्थ बाळगून त्याचे सेवन केल्याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली असून रक्ताचे नमुनेही तपासण्यासाठी संकलित करण्यात आले आहेत. सोमवारी (दि.२८) या २२ लोकांना न्यायालयापुढे पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत!
या सर्वांनी मिळून एका दिवसात महागड्या ब्रॅन्डची सुमारे सव्वा लाखाची दारु रिचविल्याचे बंगल्यांच्या परिसरात आढळून आलेल्या रिकाम्या बाटल्यांवरुन पोलिसांनी निष्पन्न केले आहे. तसेच तेवढ्याच किंमतीचा सीलबंद मद्यसाठा पोलिसांनी येथून जप्त केला आहे. ड्रग्ज, कोकेन, चरस, गांजा यांसारखे अंमली पदार्थही पोलिसांच्या हाती लागल्याने बॉलिवुडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.