दोन महिन्यांनी होणार ९३ सारखे बॉम्बस्फोट; नियंत्रण कक्षात आलेल्या फोनमुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 06:23 AM2023-01-09T06:23:01+5:302023-01-09T06:23:10+5:30
नियंत्रण कक्षात एक जणाने दूरध्वनी करून वरील ठिकाणी बॉम्बस्फोट घडविले जाणार असल्याचा इशारा दिला.
मुंबई : १९९३ मध्ये जसे बॉम्बस्फोट झाले होते तशीच बॉम्बस्फोट मालिका दोन महिन्यांनंतर माहीम, भेंडी बाजार, नागपाडा, मदनपुरा या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी बाहेरच्या राज्यातून लोकांना बोलावण्यात आले आहे, असा इशारा देणारा दूरध्वनी शनिवारी सायंकाळी मुंबईपोलिसांच्या नियंत्रण कक्षात आला आणि एकच खळबळ उडाली. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तातडीने हालचाल करत मालाड येथून एकास अटक केली. त्याचे नाव याह्या खान (५५) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण कक्षात एक जणाने दूरध्वनी करून वरील ठिकाणी बॉम्बस्फोट घडविले जाणार असल्याचा इशारा दिला. याबाबत एटीएसला माहिती मिळताच पथकाने तत्काळ दोन पथके तयार करत तपास सुरू केला. नियंत्रण कक्षात आलेल्या दूरध्वनीच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करून पथकाने मालाडच्या पठाणवाडीत राहणाऱ्या याह्या खानला मालाड रेल्वेस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपणच दूरध्वनी केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपीविरोधात जबरी चोरी, विनयभंग व अतिक्रमण असे १२ गुन्हे दाखल असून सन २०२१ मध्ये त्याला मालाड पोलिस ठाणेमार्फत तडीपार करण्यात आले होते.
‘हॉटेलात ठेवलाय बॉम्ब’
८ जानेवारीला पहाटे एका अज्ञात व्यक्तीने नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून, आपण एक गुंड असून हॉटेल दिल्ली दरबार येथे बॉम्ब पेरल्याचे सांगितले. दूरध्वनी करणारा मद्याच्या अमलाखाली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पथकाने तत्काळ हॉटेलमध्ये तपासणी केली. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही.तपासात गोविंद यादव उर्फ कालिया याने दूरध्वनी केल्याचे स्पष्ट होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत व्ही.पी. रोड पोलिस अधिक तपास करत आहेत.