घातपात नव्हे तर बिल्डरला धमकावण्यासाठी ठेवला होता बॉम्ब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 02:53 PM2019-07-04T14:53:35+5:302019-07-04T14:56:09+5:30
घातपात नसून केवळ बिल्डरला धमकाविण्यासाठी हा कट तिघांनी आखला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
नवी मुंबई - कळंबोली सेक्टर १ येथील सुधागड एज्युकेशनच्या शाळेबाहेरील रस्त्यावर बॉम्ब आढळून आला होता. याप्रकरणी तीन आरोपींना नवी मुंबई पोलिसांनीअटक केली आहे. हा बॉम्ब आईडी होता अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सुशील साठे (35), मनीष भगत (45), दीपक दांडेकर (55) अशी अटक आरोपींची नावं असून यापैकी भगत आणि दांडेकर हे नवी मुंबईमधील उलवे याठिकाणचे रहिवासी आहेत तर साठे हा हवेली कोंढवा धावडी, पुणे येथील रहिवासी आहे. या बॉम्बमुळे परिसरात एकाच खळबळ माजली होती आणि एटीएस पथक देखील कामाला लागलं होतं. काही घातपात घडवून आणण्याची चर्चा होती. मात्र, घातपात नसून केवळ बिल्डरला धमकाविण्यासाठी हा कट तिघांनी आखला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मुख्य आरोपी दांडेकर हे असून दांडेकरच्या वडिलांकडे दगड खाणींचे व्यवसाय असल्याने त्याला बॉम्ब बनविण्याची माहिती होती. साठे आणि दांडेकर यांच्यावर मोठे कर्ज आहे. कळंबोली येथे ठेवलेल्या बॉम्बव्यतिरिक्त आणखी एक बनवून ठेवलेला बॉम्ब पोलिसांना तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागला. सुशील याने हा बॉम्ब होता.
कळंबोली सेक्टर १ येथील सुधागड एज्युकेशनच्या शाळेबाहेरील रस्त्यावर बॉम्ब आढळून आला होता. हातगाडीवर ठेवलेल्या खोक्यामध्ये घड्याळाला वायरी जोडून त्या दुसऱ्या एका बॉक्सला जोडलेल्या होत्या. याची माहिती मिळताच बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने /(बीडीडीएस) त्या ठिकाणी जाऊन पाहणीअंती या वस्तू वेगवेगळ्या केल्या आहेत. त्यामध्ये घड्याळाला जोडलेल्या चार वायर ज्या सिमेंटच्या ब्लॉकमध्ये अडकवण्यात आल्या होत्या, तर त्याच्या बाजूलाच एका छोट्या पेटीमध्ये खिळे व इतर धारदार धातू ठेवण्यात आलेल्या होत्या. शिवाय विद्युत प्रवाहासाठी १२ व्होल्टची बॅटरी वापरण्यात आली होती. अखेर त्या सिमेंटच्या ब्लॉकमध्ये नेमके काय आहे, हे जाणून घेण्यासाठी रोडपाली लगतच्या एकांताच्या ठिकाणी पोलिसांनी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास स्फोटके वापरून हा सिमेंटचा ब्लॉक फोडला. त्यानंतर सकाळी बीडीडीएसच्या पथकाने त्या सिमेंटच्या ब्लॉकचे तुकडे एकत्र करून ते फॉरन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले होते. नंतर पोलिसांंच्या तपासात टोपी घातलेल्या एका व्यक्तीने ती हातगाडी त्या ठिकाणी ठेवल्याचे समोर आले. हा प्रकार तिथल्या सीसीटीव्हीत कैद झाला होता असून त्याद्वारे सदर व्यक्तीचा शोध सुरू आहे. चित्रीकरणामध्ये संबंधित आरोपीने डोक्यावर टोपी घातली होती. स्वत:चा चेहरा कॅमेऱ्यामध्ये येणार नाही याची काळजी त्याने घेतली आहे. पोलिसांनी सदर व्यक्ती ज्या रस्त्याने गेली तेथील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या.