यू ट्यूब पाहून बनविला बॉम्ब; जिवंत बॉम्ब घेऊन 'तो' पोलीस ठाण्यात पोहोचला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 02:55 PM2021-06-13T14:55:28+5:302021-06-13T15:04:34+5:30
Bomb Scare : प्रचंड खळबळ, बीडीडीएसमुळे वाचले अनेकांचे प्राण
नागपूर : जिवंत बॉम्ब घेऊन एक तरुण चक्क पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याच्याजवळ खराखुरा बॉम्ब असल्याचे कळल्याने पोलीसही हादरले. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला (बिडीडीएस) पाचारण करण्यात आले. बरेच परिश्रम केल्यानंतर तो बॉम्ब निकामी करण्यात आला. त्यामुळे स्फोटाची घटना टळून अनेकांचे जीव वाचले. नंदनवन पोलिस ठाण्यात शनिवारी हे थरारनाट्य घडले. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबानगरात राहुल युवराज पगाडे (वय २५) नामक आरोपी राहतो.
युट्युब वर बॉम्ब कसा बनवायचा, याचे त्याने व्हिडिओ बघितले आणि त्याच्या कुरापती डोक्यात बॉम्ब बनविण्याचा किडा वळवळू लागला. त्यानुसार त्याने बॅटरी, इलेक्ट्रिक सर्किट तसेच इतर साहित्य जमविले आणि बॉम्ब तयार केला. बॉम्ब तयार झाल्यानंतर तो निकामी करण्याचे तंत्र त्याला अवगत नव्हते. बॉम्बचा स्फोट होऊ शकतो आणि आपला जीव जाऊ शकतो, याची त्याला कल्पना आल्याने तो हबकला. काय करावे हे त्याला कळेना. त्यामुळे एका बॅगमध्ये हा जिवंत बॉम्ब ठेवून तो शनिवारी दुपारी सरळ नंदनवन पोलिस ठाण्यात पोहोचला. त्याने तेथील पोलीस हवालदार मडावी यांना आपल्याजवळ बॉम्ब असल्याची माहिती दिली. मनोरुग्ण असावा, असे समजून पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्याने बॅगमधून बॉम्ब काढून पोलिसांपुढे ठेवला. त्यानंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. ठाणेदार मुक्तार शेख यांनी लगेच वरिष्ठांना तसेच बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला (बीडीएस) माहिती देऊन पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. दोन मिनिटातच संपूर्ण पोलीस ठाणे रिकामे झाले. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी आरोपीच्या ताब्यातील बॉम्ब बघितला. तो ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी नेऊन बॉम्बचे इलेक्ट्रिक सर्किट बॅटरी पासून वेगळे करून बॉम्ब निकामी केला.
पोलीस यंत्रणेचा जीव भांड्यात
नंदनवन पोलिस ठाण्यात एक माथेफिरू जिवंत बॉम्ब घेऊन पोहोचल्याचे कळताच शहर पोलिस यंत्रणा हादरली. अनेक वरिष्ठांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, बॉम्ब निकामी झाल्याचे कळताच अवघ्या पोलीस यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, आरोपी राहुल पगाडेविरुद्ध भारतीय हत्यार कायदा सहकलम १२३तसेच भादविच्या अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे या खळबळजनक घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून शनिवारी आणि रविवारी सकाळपर्यंत पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली होती, हे विशेष!