बाप्पाच्या निरोपासाठी राज्यात कडेकोट बंदोबस्त; विसर्जन ठिकाणी ड्रोनद्वारे ‘वॉच’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 08:12 PM2019-09-11T20:12:20+5:302019-09-11T20:18:21+5:30

संपूर्ण महाराष्ट्रात दोन लाख तर मुंबईत ५० हजार पोलीस रस्त्यावर

Bondobast in the state for Bappa's immersion ceremony; 'Watch' by drone at immersion site | बाप्पाच्या निरोपासाठी राज्यात कडेकोट बंदोबस्त; विसर्जन ठिकाणी ड्रोनद्वारे ‘वॉच’

बाप्पाच्या निरोपासाठी राज्यात कडेकोट बंदोबस्त; विसर्जन ठिकाणी ड्रोनद्वारे ‘वॉच’

Next
ठळक मुद्देमुंबईतील चौपाट्या व विसर्जन मिरवणूकीवर ड्रोनद्वारे प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. विविध चौपाटी व महत्वाच्या विसर्जनाच्या ठिकाणी सूचना फलक, प्रथमोपचार व नागरीक सुविधा केंद्र आणि वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत.

मुंबई - उद्या अनंत चतुर्दशीदिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यातील अकरा कोटीचा जनसमुदाय सज्ज झाला असताना या विसर्जनाच्या उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दल सज्ज झाले आहे. बाप्पांचे विर्सजन कोणतेही विघ्न न येता सुरळीतपणे पार पडावे म्हणून पूर्ण राज्यभरात दोन लाखावर तर राज्याची राजधानी मुंबईत ५० हजारावर पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. गुरुवारी सकाळपासून मिरवणूक मार्ग व विसर्जनाच्या ठिकाणी पोलीस सज्ज राहणार आहेत. मुंबईतील चौपाट्या व विसर्जन मिरवणूकीवर ड्रोनद्वारे प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.
पोलिसांच्या मदतीला अन्य सुरक्षा यंत्रणा आणि होमगार्डही नेमण्यात आला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना विश्वास ठेवू नये, संशयास्पद व्यक्ती व वस्तूबाबत तात्काळ पोलिसांना कळवून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी केले आहे. काश्मीरमधील ३७० कलम हटविण्यात आल्यानंतर त्याला अतिरेकी संघटनांनी विरोध केला आहे, त्यांच्याकडून गर्दीच्या ठिकाणी घातपाती कृत्य होण्याच्या शक्यतेने पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. गणपती विसर्जन मिरवणूकीवर विशेष खबरदारी बाळगण्यात आली आहे.
गेल्या दहा दिवसांपासून बाप्पाच्या जल्लोषात मग्न असलेले भाविक आता त्याला निरोप देण्यासाठी सज्ज आहेत, विसर्जन मिरवणूक सुरळीतपणे पार पाडावी, यासाठी योग्य त्या सर्व दक्षता घेण्याचे आदेश सर्व पोलीस आयुक्त व अधीक्षकांना महासंचालक जयस्वाल यांनी दिल्या आहेत.मुंबईतील महत्वाची,गर्दीची ठिकाणी तसेच मिरवणूक मार्ग व चौपाटीच्या ठिकाणी पाच हजारावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेली आहेत. महिला व लहान मुलांच्या संरक्षणाच्या दृष्टिने विशेष पथके बनविण्यात आलेली आहेत. साध्या वेषात पाळत ठेवत राहणार आहे, हरविलेल्या मुलांसाठी , व्यक्तीसाठी ठिकठिकाणी मदत केंद्र बनविण्यात आली आहेत. त्याबाबत दक्षता घेण्यासाठी मेगाफोनद्वारे सातत्याने उदघोषण केली जाणार आहे. तसेच विविध चौपाटी व महत्वाच्या विसर्जनाच्या ठिकाणी सूचना फलक, प्रथमोपचार व नागरीक सुविधा केंद्र आणि वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत.

विर्सजनाच्या ठिकाणी ड्रोनद्वारे वॉच
श्री च्या विसर्जन सोहळा पाहण्यासाठी महानगरातील सर्व चौपाट्यांवर भाविक मोठी गर्दी करतात, याठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी या परिसरावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. संशयास्पद व्यक्तीच्या हालचाली, वस्तूवर नजर ठेवली जाईल. तसेच विसर्जनाच्या ठिकाणी जलतरणपटू,तटरक्षकासह बोटी व लॉचेस तयार ठेवण्यात आल्या आहेत.

वाहतुकीच्या मार्गात बदल
महानगरातील विसर्जन मिरवणूकीमुळे शहर व उपनगरातील वाहतुक मार्गात तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आली आहे. ५६ ठिकाणे वाहनांसाठी बंद तसेच ५३ जागी दुहेरी मार्ग बंद करुन एकेरी बनविण्यात आले आहेत. त्याशिवाय १८ ठिकाणी अवजड वाहनांना बंदी आणि ९९ ठिकाणी नो पार्किंग क्षेत्र घोषित केले आहे. त्याबाबत वाहतुक नियंत्रण शाखेकडून विशेष बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

भाविकांसाठी हेल्प लाईन
विर्सजन मिरवणूकीत कोणतीही अत्यावश्यक सेवा किंवा मदत हवी असल्यास भाविकांनी पोलीस नियंत्रण कक्षाबरोबरच ट्विटर, एसएमएसद्वारे ७७३८१३३१३३, ७७३८१४४१४४ याठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.


 

Web Title: Bondobast in the state for Bappa's immersion ceremony; 'Watch' by drone at immersion site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.