पेमेंट गेटवे हॅक करून करोडोंची विमान तिकीटं केली बुक; त्रिकुटाला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 08:59 PM2019-05-14T20:59:52+5:302019-05-14T21:00:14+5:30
राघवेंद्र रामपाल सिंह(38), राजप्रताप सिंग मनोहर सिंग परमान(27) व प्राणसिंह रामसिंह परमान(48) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
मुंबई - पेमेंट गेटवे हॅक करून करोडो रुपयांची विमान तिकीटं बुक करणाऱ्या त्रिकुटाचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या कक्ष ७ च्या पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी राघवेंद्र रामपाल सिंह(38), राजप्रताप सिंग मनोहर सिंग परमान(27) व प्राणसिंह रामसिंह परमान(48) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना डिसेंबर 2018 साली कामानिमित्त गोव्याला जायचे होते. त्यामुळे त्यांनी ओळखीच्या व्यक्तीला मुंबई ते गोवा विमान तिकीट काढण्यासाठी रक्कम दिली होती. तसेच मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अशी माहितीही त्यांनी पुरवली होती. त्यानंतर संबंधीत व्यक्तीकडून तक्रारदार यांना पीएनआर क्रमांक प्राप्त झाला. त्यांनी पीएनआर क्रमांकावरून तिकीट काढले असता तिकीटावरील मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि तिकीटाची रक्कम सर्व माहिती वेगवेगळी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता प्रवास तिकीटात ऑनलाईन हेराफेरी करून त्रयस्थ व्यक्तीचे बॅंक खाते हॅक करून त्याच्या सहाय्याने ती तिकीट खरेदी करण्यात आल्याचे तक्रारदारच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष-7 च्या पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार याप्रकरणी भा. दं. वि. कलम 465, 467, 468, 471, 420,34 सह माहिती आणि तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम 43(ब), 66(क) व 66(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला.