बुकी अनिल जयसिंघानीचा जामीन न्यायालयाने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 07:43 AM2023-04-02T07:43:52+5:302023-04-02T07:44:38+5:30
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नीला लाच व खंडणी देण्याचा प्रयत्न
लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच व खंडणी देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी असलेला बुकी अनिल जयसिंघानी याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने शनिवारी फेटाळला. या गुन्ह्यातील सहआरोपी व मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिचा जामीन अर्ज मंजूर केल्याने आपलीही जामिनावर सुटका करावी, अशी विनंती अनिल जयसिंघानी याने न्यायालयाला केली होती.
सरकारी वकील अजय मिसार यांनी जयसिंघानीच्या जामीन अर्जाला विरोध केला. संपूर्ण कट अनिल जयसिंघानीसाठी रचण्यात आला होता. वडिलांना गुन्ह्यांतून सोडवण्यासाठी अनिक्षाने लाच देण्याचा व त्यानंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार अमृता फडणवीस यांनी मलबार पोलिस ठाण्यात नोंदविली. एका आरोपीला जामीन दिल्याने दुसऱ्या आरोपीला जामीन देणे आवश्यक नाही. त्याची गुन्ह्यातील भूमिका लक्षात घेतली पाहिजे.
अनिल जयसिंघानीवर नोंदविलेल्या अनेक गुन्ह्यांत तो फरारी आरोपी आहे. आताही जामीन मंजूर केल्यास तो फरारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मिसार यांनी न्यायालयाला सांगितले.