गुजरात मधून येऊन सट्टेबाज चालवतात भाईंदरच्या हॉटेलात क्रिकेटवर सट्टा; पोलिसांच्या धाडीत १० जणांना पकडले
By धीरज परब | Published: May 11, 2023 08:58 PM2023-05-11T20:58:34+5:302023-05-11T20:58:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - भाईंदरच्या हॉटेल मध्ये क्रिकेटवर गुजरात मधील सट्टेबाज येऊन सट्टा चालवत असल्याचे नवघर पोलिसांच्या धाडीत उघडकीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदरच्या हॉटेल मध्ये क्रिकेटवर गुजरात मधील सट्टेबाज येऊन सट्टा चालवत असल्याचे नवघर पोलिसांच्या धाडीत उघडकीस आले आहे . पोलिसांनी सट्टेबाजांसह हॉटेलच्या दोघा व्यवस्थापकांना अटक केली असून हॉटेल चालक - मालक यांना देखील आरोपी केले आहे .
नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांना माहिती मिळाली कि , आझाद नगर येथील द क्राऊन हॉटेल मधून क्रिकेटवर सट्टा खेळवला जात आहे . त्यानुसार सहायक निरीक्षक योगेश काळे व गणेश केकाण सह नवनाथ घुगे , भूषण पाटील , तंत्रज्ञ करण शाह आदींच्या पथकाने हॉटेल मधील दोन खोल्यांवर धाड टाकली .
दोन्ही खोल्यां मध्ये आयपीएलच्या कोलकत्ता व पंजाब संघातील क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळवला जात होता . पोलिसांनी फरहान फिरोज चौरावाला (२७) , चिराग रोहीतभाई रावल (४०) , नजीम इकबाल लुहार (२६), पार्थ राजु बारोट (३३) , सनाउल गुलाम दाढी (२३) , मोईन सलीम घाँची (२४) , वसीम सलीमभाई घाँची (२९) व राकीब शरीफ दाढी (२२) ह्या सट्टेबाजांना लॅपटॉप , मोबाईल आदींसह ताब्यात घेतले . मोबाईल मध्ये इतरांच्या नावांची सिमकार्ड सट्ट्या साठी वापरले जात होते .
हे सर्व सट्टेबाज गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यातील हालोल , पावगड मार्गावर राहणारे तर चिराग रावल हा अहमदाबादच्या सारंगपूर , खाडिया येथील आहे. सट्ट्याचे कटिंग ते गुजरातच्या गोध्रा येथील पप्पीभाई कडे करतात . हॉटेल मधून सट्टा चालवण्यात संगनमत असलेल्या हॉटेलचे व्यवस्थापक संजय विठ्ठल शेट्टी (५०) व अँथोनी जॉन डिसोजा (२८) याना सुद्धा पोलिसांनी पकडले असून हॉटेलचे चालक - मालक यांना आरोपी केले आहे . नवघर पोलीस ठाण्यात ९ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .