बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेणारा जेरबंद, तीन बँकांची फसवणूक, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 07:44 AM2023-11-09T07:44:04+5:302023-11-09T07:44:28+5:30
अर्नाळा पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा नोंद केला होता.
नालासोपारा : विविध बँकांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेऊन फसवणूक करणाऱ्या दीपक गुलाबचंद शुक्ला यास गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तीन गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे.
२२ फेब्रुवारी २०१८ ते १९ ऑगस्टदरम्यान आरोपी चेतन शहा, विनोद मिश्रा, पंकज तिवारी आणि दीपक शुक्ला यांनी आयडीएफसी फस्ट बँक लि.ची हेतुपुरस्सर फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार केली. त्याद्वारे आयडीएफसी फस्ट बँकेमधून २९ लाख २९ हजार २५१ रुपये कर्ज मिळवून बँकेची फसवणूक केली होती.
अर्नाळा पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याकरिता गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचे तांत्रिक विश्लेषण व माहिती मिळवली. आरोपी दीपक गुलाबचंद शुक्ला (३४) याला चिखली, पिंपरी-चिंचवड येथून ताब्यात घेतले.
दीपकची चौकशी केल्यानंतर त्याच्या साथीदारांनी आयडीएफसी बँक, येस बँक, सारस्वत बँकेत अशाच प्रकारे बनावट कागदपत्रे सादर करून त्याद्वारे ८५ लाख रुपये कर्ज मिळवून बँकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-३ चे पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक अभिजित टेलर आदींनी तपास केला.