Video : एकाच मुलीवर दोघांचे प्रेम; मित्राने केली मित्राची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 07:29 PM2018-11-21T19:29:31+5:302018-11-21T19:40:07+5:30
प्रेमसंबंधातून लालबागच्या लाडूसम्राटमधील कामगाराची निर्घृण हत्या; आरोपी अटकेत
नालासोपारा - नालासोपारा येथील वालई पाडयात सापडलेल्या विकास बावधाने या तरुणाच्या निर्घृण हत्येचा छडा लावण्यात तुळींज पोलिसांना यश आले आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. तुळींज पोलिसांनी या प्रकऱणाचा तपास करून अवघ्या ३६ तासात आरोपीला जेरबंद केले आहे. आरोपी आणि मृत विकास या दोघांचेही एकाच मुलीवर प्रेम होते. दोघेही सातारा येथे राहणारे आहेत. मृत विकास हा ६ महिन्यांपूर्वी लालबाग येथील प्रसिद्ध लाडूसम्राट या हॉटेलमध्ये काम करायचा. आरोपीला प्रेमात विकासचा अडथळा वाटत असल्याने त्याचा काटा काढला अशी माहिती लोकमतशी बोलताना तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी दिली.
नालासोपारा पूर्वेकडील नालेश्वर नगर येथील वालईपाड्याच्या जंगलात सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी विकास बावधाने (वय १९) या तरुणाचा शीर आणि धड वेगवेगळ्या अवस्थेमधील मृतदेह सापडलेला होता. या मृतदेहाचे धड आणि शीर धारदार शस्त्राने कापून वेगळे फेकण्यात आले होते. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपीने विकासाचे शीर एका बॅगेत टाकले होते. तर शरीर जंगलात टाकले होते. मात्र, घटनास्थळी सापडलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून त्याची ओळख पटली होती.
ही निर्घृण हत्या असल्याने तुळींज पोलिसांनी तपासासाठी विशेष पथक स्थापन केले होते. मृत विकास बावधाने हा मूळचा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात राहणारा होता. तो सहा महिन्यांपूर्वीच लालबागच्या लाडूसम्राट हॉटेलात कमला लागला होता. त्याचे नालासोपारा येथील नात्यातील एका मुलीवर प्रेम होते. या मुलीवर विश्वास बावधने (वय २२) हा देखील प्रेम करत होता. त्याला विकासचा अडथळा वाटत होता आणि त्यामुळे त्याने विकासची हत्या करण्याचा निर्णय़ घेतला. त्यासाठी त्याने साताऱ्याहूनच छोट्या तलवारीसारखा चाकू आणला होता. सोमवारी त्याने विकासला फोन करून नालासोपारा येथे भेटण्यासाठी बोलावले. या प्रकरणाची चर्चा करण्यासाठी त्याला रिक्षात बसून वालई पाड्याच्या निर्जनस्थळी नेले आणि तेथे त्याची निर्घृण हत्या केली.
पोलिसांनी लाडूसम्राट हॉटेलात देखील मृत विकासाबाबत चौकशी केली. पोलिसांच्या पथकाने कराड येथून आरोपी विश्वासला अटक केली आहे. या हत्येत आणखी कुणाचा सहभाग होता का याचा पोलीस तपास करत आहेत. ही प्रेम प्रकरणातून झालेली हत्या असल्याची माहिती नालासोपारा विभागाचे उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी दिली. आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले. तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन, पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांच्या पथकाने तपास करून अवघ्या ३६ तासाात आरोपीला गजाआड केले आहे.