दोन्ही प्रियकर एकाच वेळी प्रेयसीच्या घरात अन् काही तासातच एकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 03:13 PM2020-06-04T15:13:28+5:302020-06-04T15:14:27+5:30
मेहरुण उद्यानात शस्त्राने भोसकून तरुणाचा खून : रात्रीतूनच केली संशयिताला अटक
जळगाव : एकाच महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधातून एका प्रियकराने दुसरा प्रियकर अंकुश उर्फ बबलु नाना हटकर (३५, रा.तांबापुरा) या तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजता मेहरुण उद्यानात घडली. दरम्यान, घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी संशयित सुभाष निंबा मिस्तरी (रा.रेणुका नगर, मेहरुण) याला अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश हटकर याचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. त्याच महिलेशी सुभाष मिस्तरी याचे देखील प्रेमसंबंध होते. सुभाष हा पूर्वी अंकुश याच्या घराच्याच शेजारी रहात असल्याने दोघांमध्ये ओळख होती. चार वर्षापूर्वी तो रेणुका नगरात वास्तव्याला गेला होता. या महिलेला तीन मुले असून पतीने सोडुन दिले आहे. अंकुश यालाच ती पती मानत होती. ही बाब अंकुश याच्या आईलाही माहिती होती. दुसरीकडे सुभाष याच्याशीही तिचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे सुभाष व अंकुश दोघांमध्ये दरी निर्माण झाली होती. बुधवारी सायंकाळी अंकुश प्रेयसी वैशाली (काल्पनिक नाव) हिच्या घरी गेला असता तेथे आधीच सुभाष आलेला होता. त्याला पाहून अंकुश संतापात बाहेर निघाला. दुसरीकडे अंकुशला पाहून सुभाषचा देखील संताप झाला.
एकाजवळ बॅट, दुसऱ्याजवळ शस्त्र
प्रेयसीच्या घरात एकाचवेळी दोन्ही प्रियकर समोरासमोर आल्याने त्या रागातून सुभाष याने अंकुश याला रात्री फोन करुन मेहरुण उद्यानात ये म्हणून सांगितले. दोघांचा मित्र असलेला अजीज हमीद तडवी हा रात्री १० वाजता अंकुशच्या घरी गेला. बबल्या घरी आहे का? म्हणून त्याने अंकुशच्या आईकडे विचारणा केली. इतक्या रात्री त्याच्याशी काय काम आहे म्हणून आईने विचारणा केली. यावेळी त्याच्या हातात बॅट होती. घरातून बाहेर येत अंकुश याने मी पाच मिनिटात येता असे आईला सांगून अजिजसोबत दुचाकीवर बसून पुढे गेला. त्यावेळी सुभाष देखील काही अंतरावर थांबलेला होता. दोघांच्या मागे सुभाष देखील निघाला. मेहरुण उद्यानात स्मशानभूमीजवळ वडाच्या झाडाजवळ वैशालीशी असलेल्या प्रेमसंबंधावरुन दोघांमध्ये वाद झाला. काही कळण्याच्या आतच सुभाष याने अंकुशच्या छातीत शस्त्राने वार केले.
पोलीस ठाण्यात नेताना बेशुध्द
अंकुशवर प्राणघातक हल्ला झाल्याने घाबरलेल्या अजिज याने दुचाकीवरुन बसवून अंकुशला एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेत असताना कस्तुरी हॉटेलजवळ तो बेशुध्द होऊन कोसळला. त्यामुळे अजिज याने इतर लोकांच्या मदतीने रिक्षातून जिल्हा रुग्णालयात रवाना केले तर अजिज तसाच अंकुशच्या घरी गेला व त्याच्या आईला घटनेची माहिती दिली. दोघांनी जिल्हा रुग्णालय गाठले असता अंकुश हा मृत झालेला होता.
विजय मल्ल्या प्रत्यार्पणाची निव्वळ अफवा? लवकरच भारतात आणण्याचे वृत्त ईडीने फेटाळली
मालकाकडे झाली वैशाली आणि अंकुशची ओळख
अंकुश हा चालक म्हणून खासगी नोकरी करायचा. त्याच मालकाकडे वैशाली धुणंभांडीचे काम करायची. तेथे दोघांमध्ये ओळख व त्याचे रुपांतर प्रेमात झाले होते. वैशाली हिला पतीने सोडले असून तीन मुले आहेत तर अंकुश याला पत्नी व तीन मुले आहेत. तो पत्नी व मुलांसह रहात होता. वडील व दोन भाऊ धरणगाव येथे राहतात. संशयित सुभाष हल अविवाहित आहे. आई अरुणाबाई नाना हटकर यांच्या फिर्यादीवरुन सुभाष याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप हजारे करीत आहेत.
पोलिसांची मेहनत आली फळाला
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, एमआयडीसीचे निरीक्षक विनायक लोकरे, उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, नीलेश पाटील, असीम तडवी व सचिन पाटील यांच्या पथकाने एकत्रित नियोजन करुन जखमीला दवाखान्यात दाखल करणाºया अजिजची मदत घेऊन घटना जाणून घेतली. त्यानंतर सुभाष याची माहिती काढली असता तो तांबापुरातील एका पार्टेशनच्या घरात बाहेरुन कुलुप लावून झोपल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी तेथे जावून खात्री केली असता सुभाष आतमध्ये लपलेला होता. त्याला अटक केल्यानंतर त्यानेही गुन्ह्याची कबुली व कारण स्पष्ट केले.
अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाचा पर्दाफाश, सीबीआयच्या जाळ्यात अडकलं रॅकेट