१२ बालकांना सॅनिटायझरचा डोस पाजणारे दोन्ही वैद्यकीय अधिकारी निलंबित; निष्काळजीपणा भोवला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 09:38 PM2021-02-04T21:38:02+5:302021-02-04T21:38:19+5:30
डॉ. महेश मनवर व डॉ. भूषण मसराम अशी या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत.
यवतमाळ: पोलिओ लसीकरणादरम्यान घाटंजी तालुक्याच्या कापसी गावातील १२ बालकांना पोलिओ ऐवजी सॅनिटायझरचे डोस दिल्याचा खळबळनजक प्रकार घडला होता. या प्रकरणी गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना चौकशीअंती अखेर निलंबित केले.
डॉ. महेश मनवर व डॉ. भूषण मसराम अशी या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी प्राथमिक चौकशीत लसीकरण केंद्रावरील अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व समूदाय वैद्यकीय अधिकारी यांची सेवा समाप्त केली होती. दुसऱ्या समितीने केलेल्या चौकशीत आरोग्य केंद्रावरील दोन्ही वैद्यकीय अधिकारी दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. या दोन्ही समितींनी दिलेला अहवाल राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे पाठविण्यात आला आहे.
भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मनवर व डॉ. भूषण मसराम या दोघांबाबतही पूर्वीपासूनच तक्रारी होत्या. यातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याचे वेतन थांबविण्यात आले होते. पोलिओ लसीकरणा दरम्यान या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याचे चौकशी समितीला आढळून आले. पोलिओ लस केंद्रांपर्यंत पोहोचविणे, कुल कॅनची व्यवस्था या सर्व बाबींमध्ये दोन्ही डॉक्टरांचा सहभाग नव्हता. हे डॉक्टर गेल्या सहा महिन्यांपासून आरोग्य केंद्राकडे फिरकले नसल्याचेही चौकशीतून पुढे आले. या गंभीरबाबींची तत्काळ दखल घेत निलंबन कारवाई करण्यात आल्याची माहिती सीईओ डॉ. पांचाळ यांनी ‘लोकमत’ला दिली.