हस्तीदंत विकताना गोव्यात दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 06:35 PM2019-03-20T18:35:53+5:302019-03-20T18:38:25+5:30
सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या दोघांनाही वेर्णा औद्यौगिक वसाहतीच्या परिसरात अटक करण्यात आली.
मडगाव - वन्य जीव संरक्षण कायद्याखाली बंदी असलेले हस्तीदंत विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या मडगावातील श्रीकांत काणेकर (४२) व विघ्नेश कारापूरकर (२९) या दोघांना वेर्णा पोलिसांनीअटक करुन त्यांच्याकडून वीस लाख रुपये किमंतीचे दोन हस्तीदंत जप्त केल्याची माहिती वेर्णाचे पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिली.
सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या दोघांनाही वेर्णा औद्यौगिक वसाहतीच्या परिसरात अटक करण्यात आली. हे हस्तीदंत कर्नाटकातून गोव्यात आणले होते अशी माहिती हाती लागली असून या प्रकरणात या दोघांशिवाय अन्य काही जणांचा हात असण्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत.
दक्षिण गोव्याचे पोलिस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, कर्नाटकातून तस्करीच्या मार्गाने गोव्यात आणले गेलेले हे हस्तदंत दोघेजण विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकातर्फे त्यांच्याशी संपर्क साधला. त्या दोघांनाही वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीतील निर्जनस्थळी बोलावून त्यांच्याशी सौदा करण्याच्या बहाण्याने त्यांना सापळ््यात अडकवले.