बाेठे करायचा माझ्या आईचा सतत छळ, रेखा जरे यांच्या मुलाचे पोलिसांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 05:50 AM2020-12-08T05:50:46+5:302020-12-08T05:53:29+5:30
Rekha Jare Murder Case : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे याने माझ्या आईचा अनेकदा शारीरिक व मानसिक छळ केला आहे.
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे याने माझ्या आईचा अनेकदा शारीरिक व मानसिक छळ केला आहे. त्याच्यापासून आमच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका असून, पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी जरे यांचा मुलगा रुणाल याने सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात रुणाल जरे याने म्हटले आहे की, बोठे याचे आमच्या घरी नेहमी जाणे-येणे असायचे. तो माझी आई रेखा यांना नेहमी जीवे मारण्याची धमकी द्यायचा. तू नाही तर तुझ्या मुलांना जिवंत सोडणार नाही, असे बोलायचा. त्याची आमच्या कुटुंबावर मोठी दहशत होती. त्यामुळे आम्ही कुणीच त्याच्याविरोधात बोलत नव्हतो. माझ्या आईने यापूर्वी त्याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अर्जही दिले आहेत. बोठे यानेच माझ्या आईचे हत्याकांड करून तो फरार झाला. बोठे अथवा त्याच्या हस्तकांपासून आम्हाला धोका आहे.
बोठे गुंड प्रवृत्तीचा
जातेगाव घाटात माझ्या आईची हत्या झाली तेव्हा त्या ठिकाणी आजी सिंधूबाई व भाऊ कुणाल आईसोबत होते. हे दोघे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. बोठे हा गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याने आधीही आम्हाला संपवून टाकण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे, अशीही मागणी रुग्णाल यांनी या निवेदनातून केली आहे.
आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
दरम्यान याप्रकरणी अटक असलेल्या पाच आरोपींपैकी आदित्य सुधाकर चोळके व फिरोज राजू शेख यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, तर सागर उत्तम भिंगारदिवे, ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे व ऋषीकेश ऊर्फ टप्या वसंत पवार यांना ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नाशिकमधील हॉटेलमध्ये लपला होता बोठे
नगरमधून पसार झाल्यानंतर बोठे हा नाशिकमधील एका हॉटेलमध्ये लपून बसला होता. ही बाब पोलिसांना समजली तेव्हा तेथे तत्काळ एक पथक पाठविण्यात आले. बोठे मात्र पोलीस दाखल होण्याच्या आधीच हॉटेलमधून पसार झाला होता. गेल्या तीन ते चार दिवसांपासून बोठे पोलिसांना गुंगारा देत आहे.