बीकेसीत जीवघेणे स्टंट करणारा २४ वर्षीय फय्याज कादरी अखेर गजाआड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 06:24 AM2023-04-04T06:24:27+5:302023-04-04T06:24:55+5:30
पोलिसांनी साकिनाक्यातून गाशा गुंडाळला, सोबत बसलेल्या दोन तरुणींची ओळख पटविण्याचे काम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वांद्रेत बीकेसी परिसरात मोटर सायकलवर दोन तरुणी आणि एक तरुण जीवघेणे स्टंट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. स्वतःचे लोकेशन बदलत पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या फय्याज अहमद अजीमुल्ला कादरी (२४) या चालकाला रविवारी साकीनाका परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तर त्याच्या सोबत बसलेल्या दोन तरुणींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
परिमंडळ ८ चे पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कादरी हा वडाळ्याचा राहणारा असून त्याच्यावर यापूर्वी वडाळा ट्रक टर्मिनस पोलिस ठाण्यात तसेच अँटॉप हिल पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस त्याच्या मागावर असल्याने तो सतत त्याचा पत्ता बदलत होता. आम्ही त्याचा साकीनाका येथील सध्याचा पत्ता शोधून काढत त्याला अटक केल्याचे गेडाम यांनी सांगितले.
काय आहे व्हिडीओत?
- मुंबईच्या रस्त्यावर केलेल्या धोकादायक बाईक स्टंटच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये कादरी त्याच्या समोर बसलेली मुलगी आणि मागे बसलेल्या दुसऱ्या मुलीसह भरधाव वेगात गाडी चालवतो.
- या दरम्यान दुचाकीचे पुढचे चाक तो वर उचलत मागच्या चाकावर कित्येक मीटरपर्यंत गाडी पळवतो. रायडरच्या मागे-पुढे बसलेल्या मुली हात हलवत, हसत असून तिघांपैकी एकानेही हेल्मेट घातलेले नव्हते.
- हा व्हिडीओ पॉथहोल वॉरियर्स फाउंडेशन नावाच्या ट्विटर पेजने शेअर केला होता. या ट्विटची दखल घेत वाहतूक पोलिसांनी बीकेसी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल केला.