हिरे व्यापारी भरत शहा यांच्यासह मुलगा, नातवावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 07:44 AM2019-11-25T07:44:04+5:302019-11-25T07:44:14+5:30
पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी सुप्रसिद्ध हिरे व्यापारी आणि चित्रपट निर्माता भरत शहा यांच्यासह त्यांचा मुलगा आणि नातवावर गावदेवी पोलिसांनी शनिवारी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले.
मुंबई : पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी सुप्रसिद्ध हिरे व्यापारी आणि चित्रपट निर्माता भरत शहा यांच्यासह त्यांचा मुलगा आणि नातवावर गावदेवी पोलिसांनी शनिवारी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. या प्रकरणी शहा यांचा नातू यश याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
ग्रॅण्ट रोडमधील भुलादेसाई रोडवर असलेला डर्टी बन्स सोबो हा पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे या पथकाला दिसले. गावदेवी पोलिसांचे एक पथक नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांचे लक्ष या पबकडे गेले. पथकाने नियमानुसार दीड वाजता पब बंद करण्याची विनंती केली. मात्र यश आणि तेथील रोहन पारीख यांनी याकडे दुर्लक्ष करत पब सुरू ठेवला. पोलीस अधिकारी अर्जुन डांगे हे पथकासह रात्री पावणे दोनच्या सुमारास पुन्हा पबवर पोहोचले. त्यांनी पब बंद करण्याची विनंती करताच, येथील ग्राहकांनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली. पोलीस शिपाई संतोष पवार यांना मारहाणही केली. त्यानंतर, यश त्याच्या मर्सिडीज कारमधून निघून गेला, तर रोहन पारीख याने तेथून पळ काढला. मात्र, पोलिसांना या दोघांसह अन्य एकाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याची माहिती मिळताच भरत शहा हे त्यांचा मुलगा आणि यशचे वडील असलेल्या राजीव यांच्यासह गावदेवी पोलीस ठाण्यात पोहोचले. यश याच्याकडे विचारणा करत त्याच्या अटकेवरून या दोघांनीही पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना मारहाण केल्याची माहिती मिळते. पहाटे पाचपर्यंत हा प्रकार सुरू होता. अखेर पोलिसांनी शहा यांच्यासह त्यांचा मुलगा राजीव आणि नातू यश विरोधात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गावदेवी पोलीस अधिक तपास करत आहेत.