लग्नास नकार दिला म्हणून तरूणीने केलं तरूणाचं अपहरण, मंदिरात जबरदस्ती करणार होती लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 06:03 PM2022-07-08T18:03:57+5:302022-07-08T18:05:47+5:30
UP Crime News : पोलिसांनुसार, तरूणाने लग्नास नकार दिल्याने नाराज झालेल्या तरूणीने आपला भाऊ आणि त्याच्या मित्रांसोबत मिळून तरूणाचं अपहरण केलं. तरूणाला जबरदस्ती आर्य समाज मंदिरात नेण्यात आलं.
UP Crime News : उत्तर प्रदेशच्या बिजनौरच्या चांगपूरमध्ये ज्यूडिशिअल मॅजिस्ट्रेटच्या स्टेनोचं सिनेमा स्टाइलने ऑफिसला जाताना अपहरण करण्यात आलं. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. त्यानंतर चार तासातच पोलिसांनी अपहरण झालेल्या तरूणाचा शोध लावला. तर तसेच पोलिसांनी अपहरण करणाऱ्या तरूणीला आणि तिच्या भावाच्या साथीदारांना अटक केली.
पोलिसांनुसार, तरूणाने लग्नास नकार दिल्याने नाराज झालेल्या तरूणीने आपला भाऊ आणि त्याच्या मित्रांसोबत मिळून तरूणाचं अपहरण केलं. तरूणाला जबरदस्ती आर्य समाज मंदिरात नेण्यात आलं. यादरम्यान तरूणाच्या मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलीस मंदिरात पोहोचले आणि त्यांनी तिन्ही आरोपींना अटक केली. तेच तरूणाला सुखरूप परत आणलं.
पोलीस अधिक्षक दिनेश सिंह यांनी सांगितलं की, चांदपूर ज्युडिशल मॅजिस्ट्रेटचे स्टेनो अंकुरचं ऑफिसला जाताना काही लोकांना अपहरण केलं होतं. त्याला कारमधून उचलून नेण्यात आलं होतं. अंकुर यावेळी त्याच्या साथीदारासोबत ऑफिसला जात होता.
या घटनेची सूचना मिळताच पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी अंकुरचा मोबाइल ट्रेस केला. त्यानंतर त्याचा पाठलाग केला. त्याद्वारे पोलीस आर्य समाज मंदिरात पोहोचले. अपहरण करणारी तरूणी आणि तिच्या भावाच्या मित्रांना पकडण्यात आलं आहे. इतर चार फरार झाले. चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितलं की, स्टेनो अंकुरचं लग्न 14 मे 2021 ला तरूणीसोबत होणार होतं. त्यावेळीच हुंडा, गाडी, भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. पण नंतर अंकुरने तरूणीसोबत लग्न करण्यास नकार दिला.
आरोपींनी सांगितलं की, तरूणाला लग्नासाठी अनेकदा समजावण्यात आलं. पण तो तयार नव्हता. त्यामुळे त्याचं तरूणीसोबत लग्न लावून देण्याच्या उद्देशाने त्याचं अपहरण करण्यात आलं. लग्न लावण्यासाठी त्यांना आर्य समाज मंदिरात नेलं होतं. मंदिरात आरोपी तरूणीचं आणि अंकुरचं लग्न लावून देण्यात येणार होतं. जर तो लग्नासाठी तयार झाला नसता तर त्याची हत्या करण्यात येणार होती.
अंकुरने सांगितलं की, त्याचं लग्न या तरूणीसोबत ठरलं होतं. पण फोनवर बोलल्यावर त्यांच्यात काहीतरी वाद झाला. यानंतर त्याने लग्नास नकार दिला. यादरम्यान दोन्हीकडील लोकांमध्ये अनेक बैठकी झाल्या. हुंड्यातील सगळं काही करण्याचं ठरलं होतं. मुलीकडील लोकांनीही हे मान्य केलं. पण घरी जाऊन नकार देत होते आणि आरोपी जबरदस्ती लग्न करण्यास दबाव टाकत होते.
लग्न न केल्यास जीवे मारण्याची आणि अपहरण करण्याची धमकी दिली जात होती. अशातच गुरूवारी ऑफिसला जात असताना अंकुरची बाइक अडवली गेली आणि त्याला एका कारमध्ये टाकून नेण्यात आलं. आर्य समाज मंदिरात त्याचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात येणार होतं.