हत्या की अपघात? मुलगा पोलीस ठाण्यात वडिलांची मिसिंग तक्रार द्यायला गेला; मिळाली मृत्यूची बातमी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 12:17 AM2021-10-27T00:17:11+5:302021-10-27T00:17:44+5:30
पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केली. परिसरात सुरू असलेली उलटसुलट चर्चा आणि मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे बेलतरोडी पोलिसांनी काही संशयितांना पोलीस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चाैकशी सुरू होती.
नागपूर- रात्रीपासून बेपत्ता असलेल्या एका वाहनचालकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, ते बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी त्यांचा मुलगा मंगळवारी दुपारी बेलतरोडी पोलीस ठाण्यात पोहचला अन् तेथे त्याला वडिलांच्या मृत्युचीच बातमी मिळाली.
अरुण गोपीचंद घरडे (वय ५३) असे मृताचे नाव असून, ते बेसा परिसरात राहायचे. घरडे बोलेरो मालवाहक चालवायचे. सोमवारी रात्री ते वाहन घेऊन वाडीकडे गेले होते. रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलासोबत त्यांचे बोलणे झाले. लवकर येतो, असे सांगणारे घरडे मध्यरात्रीपर्यंत घरी परतले नाही. त्यांचा मोबाईलही बंद होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी पोलीस पाटलाने बेलतरोडी पोलिसांना आऊटर रिंग रोडलगच्या झाडाझुडपात एक मृतदेह पडून असल्याची माहिती दिली. पोलीस तेथे पोहचले तेव्हा घरडेंचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. मृतदेहावर जखमाही दिसत होत्या. बाजूलाच त्यांचे बोलेरो वाहनही होते. त्यामुळे हत्येचा संशय होता. घटनास्थळी पोलीस पंचनामा करीत असतानाच घरडे यांच्या कुटुंबीयांनी बेलतरोडी पोलीस ठाणे गाठले. वडील बेपत्ता असल्याचे घरडे यांचा मुलगा सचिन याने पोलिसांना सांगितले. बोलेरो वाहन ते घेऊन गेले होते, ही माहिती मुलाने देताच पोलिसांनी त्याला घटनास्थळी नेले. तेथे मृतदेह दाखवताच घरडे कुटुंबीयांनी टाहो फोडला. तो मृतदेह अरुण घरडे यांचाच होता. त्यांची हत्या झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला.
पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केली. परिसरात सुरू असलेली उलटसुलट चर्चा आणि मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे बेलतरोडी पोलिसांनी काही संशयितांना पोलीस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चाैकशी सुरू होती.
लिफ्टमुळे ॲक्सिडेंट?
बेसा-बेलतरोडी भागातील एका इमारतीत असलेल्या एका महिलेच्या फ्लॅटमध्ये घरडे गेले होते. तेथे लिफ्ट अंगावर पडून ते गंभीर जखमी झाल्याची जोरदार चर्चा आहे. आरोपींनी गंभीर जखमी झालेल्या घरडेंना उचलून वाहनात घातले आणि बेलतरोडी रिंगरोडवर फेकून दिल्याचेही सांगितले जाते. पोलीस निरीक्षक रवींद्र नाईकवाड आणि सहकारी प्रकरणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.