बहिणीला छेडणाऱ्या युवकाची दोन अल्पवयीन मुलांनी केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 10:30 PM2020-12-25T22:30:12+5:302020-12-25T22:31:05+5:30
Murder : लुंबिनीनगरातील घटना, दोन विधीसंघर्षित मुले ताब्यात
अमरावती : बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून संतापलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी एका युवकाची चाकूने सपासप वार करून हत्या केली. ही घटना फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील कुंभारवाडा स्थित लुंबिनीनगरात शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी दोन अल्पवयीन मारेकऱ्यांना ताब्यात घेतले.
पोलीस सूत्रानुसार, रितेश ऊर्फ बंटी संतोष बारसे (२१, रा. पंचशीलनगर, अमरावती) असे मृताचे नाव आहे. मृत युवक पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर चोरी, लुटमारीचे गुन्हे फ्रेजरपुरा ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी १६ व १७ वर्षीय विधी संघर्षित बालकावर भादंविचे कलम ३०२, ३४, सहकलम ४,२५ आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंदविला. रितेश हा मजुरीचे काम करीत होता. त्याने यातील एका आरोपीच्या बहिणीची छेड काढली. त्यानंतर मित्राच्या सहकार्याने भावाने रितेशचा काटा काढण्याचे ठरविले. शुक्रवारी रितेश लुंबिनीनगरात एकटा उभा असताना दोन्ही आरोपींनी त्याच्यावर चाकुने हल्ला केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. रक्तबंबाळ स्थितीतील रितेशला पोलीस व नागरिकांनी इर्विन रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. यावेळी पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम, एपीआय बिपीन इंगळे, डीबी स्कॉडचे एएसआय प्रकाश राठोड, सागर, भजगवरे, अनूप झगडे, दीपक सुंदरकर, सागर पंडित उपस्थित होते.
पोहरा मार्गावरून घेतले ताब्यात
युवकाचा खून झाल्याची घटना वाॅकीटॉकीवरून पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांना मिळाली, तेव्हा ते गस्तीवर होते. चांदूररेल्वे, पोहरा मार्गावरील एका हॉटेलजवळून ते येत असताना दुचाकीवरून आरोपी जाताना दिसले. पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. पाठलाग करून वैष्णवदेवीच्या मंदिराजवळून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता युवकाची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन चाकू आढळून आले.