लग्न मोडले म्हणून कुटूंबियांवर टाकला बहिष्कार; दहा जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 08:59 PM2021-07-29T20:59:21+5:302021-07-29T21:00:27+5:30
Jaat Panchayat : मांडवा येथील जात पंचायतीचा अजब निर्णय
उमरेड : मे २०२० ला शुभमंगल ठरल्यानंतर लग्नाची तयारी सुरू झाली होती. अशातच लॉकडाऊनमुळे लग्न पुढे ढकलल्या गेले. आर्थिक परिस्थितीच्या कारणावरून वधुकडील कुटूंबियांनी लग्नापूर्वीचा झालेला ७० हजार रुपयांचा खर्च नवरदेवाला मागितला. वर मुलाने ही मागणी धुडकावून लावली. लग्न मोडले. त्यानंतर जात पंचायत बसविण्यात आली. जात पंचायतीने मुलासह संपूर्ण कुटूंबियांवर बहिष्कार टाकला. फेब्रुवारी २०२१ ते आजपर्यंत या बहिष्काराचा मन:स्ताप कुटूंबियास सोसावा लागत असल्याचा आरोप करीत उमरेड पोलीस ठाण्यात गुरुवारी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय तेजराम राठोड (३२, रा.मांडवा, ता. भिवापूर) असे तक्रारकर्त्या वर मुलाचे नाव आहे. याप्रकरणामुळे ‘जात पंचायती’च्या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. दावला दलसिंग जाधव या प्रमुख नायकासह झुमा कुंवरसिंग मेघावत, ताराचंद कुंवरसिंग मेघावत, सदाराम दादु चव्हाण, किसन गुलाब पवार, बाबासाहेब सेवु राठोड, देवाराम घोलवा राठोड, बहादुर वसराम राठोड, नेलसिंग लालसिंग पवार आणि चेलसिंग लालसिंग पवार सर्व रा.मांडवा, ता. भिवापूर अशी आरोपींची नावे आहेत.
आर्वी, जि. वर्धा येथील एका मुलीशी मांडवा येथील निवासी विजय राठोड या तरुणाचे लग्न जुळले. ५ मे २०२० ला विवाह सोहळा ठरला. वर-वधुकडील कुटूंबियांनी लग्नसमारंभाची तयारी केली होती. अशातच लॉकडाऊनमुळे तारीख पुढे ढकलल्या गेली. डिसेंबर २०२० च्या अखेरीस मुलीकडील कुटूंबियांनी लग्नापूर्वीच्या खर्चापोटी वर मुलगा विजय राठोड यास ७० हजार रुपयांची मागणी केली. विजय राठोड याने रक्कम देण्यास नकार दर्शविला. वाद वाढला. अशातच मुलीकडील मंडळींनी वर मुलाच्या मांडवा गावातच ३ फेब्रुवारी २०२१ ला जात पंचायत बसविली.
जात पंचायतीमध्ये सुद्धा मी लग्नास तयार आहे परंतु रक्कम देवू शकत नाही, अशी भुमिका विजय राठोड याने स्पष्ट केली. आरोप-प्रत्यारोप झाले. लग्न मोडले. विजय राठोड याच्यामुळे लग्न मोडल्या गेले, असा ठपका जात पंचायतीने ठेवत विजय राठोड आणि कुटूंबियांवर बहिष्कार टाकत असल्याचा निर्णय दिला. असे तक्रारीत नमूद आहे.
अशी टाकली बंदी
३ फेब्रुवारी २०२१ ला दावला जाधव या प्रमुख नायकाच्या नेतृत्त्वात जात पंचायतीने विजय राठोड व कुटूंबियास जाती बाहेर करीत गावातील सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याची बंदीचा निर्णय जाहीर केला. कुटूंबियांना मंदिरामध्ये जाण्यास बंदी टाकल्या गेली. तक्रारकर्त्याच्या शेतात शेतमजुरांना सुद्धा जाण्यास बंदीचा निर्णय जात पंचायतीने घेतला. गावातील लोकांना विजयच्या घरी जाण्याची बंदी टाकण्यात आली, अशी बाब तक्रारीत नमूद आहे.
कुटूंब दहशतीत
उमरेडपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडवा या गावाला लागून लभान (मांडवा) हे दुसरे गाव आहे. या परिसरात फेब्रुवारी महिन्यात मोठी यात्रा भरते. या यात्रेदरम्यान मंदिरात विजय राठोड याच्या आईला प्रवेश नाकारला गेला. काकाच्या मुलाच्या लग्नालाही थांबविण्यात आले, असा आरोप विजय राठोड याने केला आहे. जात पंचायतीच्या बहिष्काराच्या निर्णयानंतर आई-वडिल, भाऊ आणि मी असे संपूर्ण कुटूंब दहशतीत असल्याची कैफीयत विजय राठोड याने लोकमतजवळ मांडली.
गुन्हा दाखल, तपास सुरु
मांडवा येथील बंजारा समाजाच्या जात पंचायतीने विजय व त्याच्या कुंटूबियांस समाजातून बहिष्कृत केल्याने विजयच्या तक्रारीवरून उमरेड पोलीस ठाण्यात १५३ ब, ३४ भादवि सहकलम ३,५ महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम २०१६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राजीव लोले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.