प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराने महाविद्यालयाबाहेर तरुणीला केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 09:31 PM2020-01-07T21:31:52+5:302020-01-07T21:34:22+5:30
या प्रकरणी त्या तरुणास पोलीसांनी अटक केली असून त्याच्या तीन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
मीरारोड - दुसऱ्या मुलीशी असलेले प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर १९ वर्षाच्या महाविद्यालयीन विद्यार्थीनीने प्रियकराशी प्रेमसंबंध तोडले. त्यामुळे चिडलेल्या तरुणाने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेरच तिला गाठून मारहाण केली. तिला सोडवण्यास मध्ये पडलेल्या विद्यार्थ्यास देखील त्याने व मित्रांनी मारहाण केली. या प्रकरणी त्या तरुणास पोलीसांनी अटक केली असून त्याच्या तीन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
भाईंदरच्या नवघर येथे असलेल्या महाविद्यालयासमोर आज मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या विद्यार्थीशी गेल्यावर्षी वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात असताना तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विनीत प्रमोद पाटील (२०) याने तिच्याशी ओळख केली होती. विनीतने इंस्टाग्रामवर तिला मैत्रीची विनंती पाठवली होती. पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. परंतु गेल्या वर्षीच्या नवरात्रीत विनीत व ती तरुणी बोलत असताना एका मुलीने येऊन विनीतशी आपले प्रेमसंबंध असल्याचा भांडाफोड केला.
आपली फसवणूक झाल्याचे कळल्यावर त्या विद्यार्थीनीने विनीतशी असलेले प्रेमसंबंध कायमचे तोडून टाकले होते. परंतु विनीत मात्र तिचा सतत पाठलाग करत असे व बोलण्यासाठी तगादा लावत असे. मंगळवार ७ जानेवारी रोजी सकाळी विनीत पाठलाग करत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचला. तेथे जाऊन त्याने तिने भेट म्हणून दिलेले शर्ट व रिंग तिला परत केली व तिला चल निघ असे रागाने म्हणाला. तिने देखील तु निघ असे प्रत्युत्तर देताच संतापलेल्या विनीतने तिचा गळा धरुन कानाखाली मारले. यावेळी तिचा सहकारी विद्यार्थी सोडवण्यास मध्ये पडला असता विनीतने व त्याच्या तीन मित्रांनी त्याला शिवीगाळ दमदाटी करत बेदम मारहाण केली. या प्रकरणी नवघर पोलीसांनी आरोपी विनीत याला अटक केली असून त्याच्या अन्य तीन साथीदारांचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी सांगितले.