प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या, दुसऱ्या तरूणाशी लग्न ठरल्याच्या रागातून आवळला गळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 05:45 PM2022-05-31T17:45:32+5:302022-05-31T17:46:45+5:30
Murder And Suicide Case : डोंबिवलीतील हायफ्रोफाईल संकुलातील घटना
डोंबिवली: प्रेयसीचे दुस-या तरूणाशी लग्न (Marriage)ठरल्याच्या रागातून प्रियकराने तीची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुर्वेकडील कासारिओ गोल्ड गृहसंकुलातील म्युरियल बिल्डींगमध्ये सोमवारी घडली. दोघांचे मृतदेह घरातील (House) बेडरूमध्ये आढळून आले होते. दोघांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज होता. मात्र शवविच्छेदन अहवालात तीची हत्या गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मृत प्रियकराविरोधात हत्येचा गुन्हा मानपाडा पोलिस (police) ठाण्यात दाखल करण्यात आला.
अनिल मधुकर साळुंके (वय ३३) राहणार वडनेर भैरव, नाशिक आणि ललीता सुरेश काळे (वय २८) रा. डोंबिवली अशी दोघा मृत प्रियकर, प्रेयसीची नावे आहेत. दोघांमध्ये गेल्या सहा वर्षापासून प्रेम होते. त्यानेच ललीताला डोंबिवलीत भाडयाने घर घेऊन दिले होते. तेथे ललीता आई आणि बहीणीसह राहायची. त्यांच्या घरच्यांनाही दोघांच्या संबंधांबाबत माहीती असल्याने अनिल त्यांच्या डोंबिवलीतील घरात अधूनमधून यायचा. दरम्यान अनिल हा विवाहीत असून त्याला दोन मुले देखील आहेत, अशी माहीती ललीताला समजल्यानंतर तीनेही अन्य एका तरूणासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. तीचा तरूणासोबत साखरपुडा देखील झाला होता. याचा राग अनिलला होता. दरम्यान शेवटचे भेटायचे आहे तसेच दोन लाख रूपये दयायचे आहेत असा बहाणा करून अनिल तिला रविवारी संध्याकाळी भेटण्यासाठी घरी आला. रात्री बेडरूममध्ये तिच्यासोबत झोपला असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्याने नायलॉन दोरीने ललीताचा गळा आवळून तसेच नाका तोंडावर उशी दाबून तीची हत्या केली आणि त्यानंतर त्याच नायलॉनच्या दोरीने छताच्या पंख्याला गळफास लावून स्वत:ने आत्महत्या केली. ललीताच्या बहिणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात मृत अनिल विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.
...आणि हत्या झाल्याचे उघड
सोमवारी सकाळी 11 वाजले तरी बेडरूमचा दरवाजा न उघडला गेल्याने ललीताच्या बहिणाने दरवाजा ठोठावून बघितला. परंतू तो आतून प्रतिसाद मिळाला नाही. तीने आजुबाजुच्या लोकांच्या मदतीने दरवाजा उघडला असता हा धककादायक प्रकार समोर आला. अनिलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला तर ललीताचा मृतदेह बेडवर आढळुन आला. प्रथमदर्शनी दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज बांधण्यात आला. परंतू ललीताची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले.