दोन गुंडांमध्ये भांडण; छोटा राजनचा साथीदार डी. के. रावने केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 08:22 PM2019-04-09T20:22:24+5:302019-04-09T20:26:48+5:30
मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारातच बाचाबाची झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
मुंबई - कुख्यात छोटा राजनचा विश्वासू साथीदार डी. के. राव आणि त्याचा साथीदार अनिल पाटील यांच्यात मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारातच बाचाबाची झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोमवारी न्यायालयापुढे हजर करण्यासाठी त्यांना आणण्यात आले. त्यावेळी हा प्रकार घडला. त्यावेळी दोघांमध्ये हाणामारी झाली.
कुलाबा पोलीस ठाण्यात जाऊन अनिल पाटीलने याप्रकरणी तक्रार नोंदवली असून अदलखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छोटा राजनचा विश्वासू साथीदार राववर हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न अशाप्रकारचे 30 गंभीर गुन्हे दाखल आहेत. राव आणि पाटील यांना आर्थर रोड कारागृतून पोलीस बंदोबस्तात कोर्टात सुनावणीसाठी हजर केले होते. सुनावणीला थोडा अवकाश असल्याने हे दोघे न्यायालयाबाहेर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील पायऱ्यांजवळ थांबले होते. त्याचवेळी रावने पाटीलला, "त्या बांधकाम व्यावसायिकाला संदेश पाठवण्यास सांगितले. त्यावरून झालेल्या वादातून दोघांनी भांडणाला सुरू केली. रावने पाटीलच्या डोक्यात मारल्यानंतर दोघांमध्ये मारहाणीला सुरूवात झाली. यावेळी पाटीलचे काही साथीदार जे आसपासच उपस्थित होते. ते देखील पाटीलच्या मदतीला धावून आले. त्यामुळे घाबरुन रावने तिथून पळ काढत थेट मोक्का न्यायालय गाठलं. तिथे त्याने न्यायधीशांकडे याची तक्रार केली. यावर न्यायालयाने पोलिसांना यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.