क्रूझमधील ड्रग्ज तपासाला ‘ब्रेक’; कुठलाही ठोस पुरावा हाती लागला नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 10:03 AM2021-12-23T10:03:31+5:302021-12-23T10:04:12+5:30
मुंबई पोलिसांकडून कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास पुढील आदेश येईपर्यंत थांबविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मुंबई पोलिसांकडून कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास पुढील आदेश येईपर्यंत थांबविण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आतापर्यंत २० जणांकडे चौकशी केली आहे. मात्र त्यातून कुठलाही ठोस पुरावा हाती लागला नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांना वारंवार समन्स बजावूनदेखील त्या जबाब नोंदविण्यासाठी हजर झालेल्या नाही. वेळोवेळी प्रकृतीचे कारणे त्यांनी पुढे केली आहेत. या प्रकरणात त्यांचा जबाब महत्त्वाचा आहे.
आतापर्यंत मुंबई पोलिसांनी २० जणांची चौकशी केली आहे. मात्र त्यांच्या चौकशीतून काहीही निष्पन्न झालेले नाही. तसेच मुंबई पोलीस एनसीबीच्या दक्षता पथकाकडून येणाऱ्या अहवालाच्या प्रतीक्षेत असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत तपास थांबविल्याचे तपास पथकाकडून स्पष्ट करण्यात आले.