Breaking : अंबानी कुटुंबीय धमकी प्रकरणात बिहारमधून आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 12:53 PM2022-10-06T12:53:17+5:302022-10-06T12:53:38+5:30

रिलायन्स समुहाकडून चालवण्यात येणारे रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय आणि अंबानी कुटुंबीयांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली होती.

Breaking:Accused arrested from Bihar in reliance mukesh Ambani family threat case | Breaking : अंबानी कुटुंबीय धमकी प्रकरणात बिहारमधून आरोपीला अटक

Breaking : अंबानी कुटुंबीय धमकी प्रकरणात बिहारमधून आरोपीला अटक

Next

रिलायन्स समुहाकडून चालवण्यात येणारे रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय आणि अंबानी कुटुंबीयांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून धमकीचा फोन आला होता. त्यामध्ये रिलायन्स रुग्णालय उडवून देण्याची आणि अंबानी कुटुंबीयांनाही धमकी देण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी एका आरोपीला बिहारमधून अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

बिहारणधील दरभंगा जिल्ह्यातील मनीगाछी येथून एकाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव राकेश कुमार मिश्रा असं आहे. मुंबई पोलिसांनी दरभंगा पोलिसांच्या मदतीनं आरोपीला अटक केली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीला आता मुंबईत आणण्यात येत आहे.

दरभंगाचे एसएसपी अवकाश कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव राकेश कुमार मिश्रा असून तो मानसिकरित्या आजारी असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं म्हटलं. तसंच मुंबई पोलीस त्याला सोबत घेऊन गेली असून पुढील कारवाई मुंबई पोलिसांकडून होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

“५ तारखेला रिलायन्स फाऊंडेशनच्या लँडलाईनवर दोनदा अनोळखी नंबरवरून धमकीचा फोन आला होता. त्यात हॉस्पीटल आणि अँटिलिया दोन्ही बॉम्बनं उडवण्याची धमकी दिली होती. अंबानी कुटुंबीयांच्या काही सदस्यांनाही धमकी दिली होती. या प्रकरणाची गंभीरता पाहून मुंबई पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि पथक तयार करून आरोपीच्या अटकेसाठी ते रवाना करण्यात आले. मध्यरात्री दरभंगा बिहारमधून आरोपी तेथील पोलिसांच्या सहकार्याने आरोपीचा ताबा घेतला आहे. आरोपीला घेऊन टीम मुंबईत येतेय आणि त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. याचा तपास केला जात आहे,” अशी प्रतिक्रिया यानंतर पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी दिली.

काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.५७ वाजण्याच्या  सुमारास परिमंडळ २ अंतर्गत डी बी मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल प्राप्त झाला होता. सदर धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची तसेच अंबानी कुटुंबीयांच्या संदर्भात धमकी दिलेली होती. या धमकीच्या फोननंतर डॉ. डी.बी.मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची आला होता. तसंच यानंतर मुंबई पोलिसांनी तपासही सुरू केला होता.

Web Title: Breaking:Accused arrested from Bihar in reliance mukesh Ambani family threat case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.